पान:मराठी रंगभुमी.djvu/214

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८०
मराठी रंगभूमि.


संबंध असणा-या इतर व्यक्तींचें वर्तन ठेवून प्रसंगही तसेच घातले पाहिजेत. याखेरीज कालस्थलांचीही एकवाक्यता ठेवली पाहिजे. अलीकडे कित्येक नाटककार आपल्याला आवडतील तसे किंवा कंपनीस उपयोगी पडतील तसे फेरफार या गोष्टींत करीत असतात. पण त्यानें ऐतिहासिक व्यक्तींबद्दलचें खरें ज्ञान प्रेक्षकांना न होतां लोकशिक्षणाची दिशा चुकवून त्यांना आडमार्गांत नेऊन टाकल्याचा दोष त्यांच्या पदरीं येतो. करितां ग्रंथकार व नाटकमंडळ्या या दोघांनींही याबद्दल सावध असावें. असो; हल्ली मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें जास्त उपलब्ध झालीं असून अनेक ऐतिहासिक कागदपत्रही पुढे येत आहेत. अशा वेळीं पूर्वीच्या नाटकांत दुरुस्ती करून त्यांचे प्रयोग रंगभूमीवर आल्यास चांगलें होईल. ऐतिहासिक नाटकें चांगल्या रीतीनें पुढें येण्यास त्या नाटकांस कोणत्या तरी रीतीनें उत्तेजन वर सांगितल्याप्रमाणें कॉलेजांकडून जसें देतां येण्यासारखें आहे. तसेंच नाटक मंडळींनीही बक्षिसें ठेवून देतां येण्यासारखें आहे. हल्ली नाटक मंडळी सार्वजनिक कामास जशी मदत करूं लागली आहे तशीच अशा प्रकारचे ग्रंथ तयार करण्याचे कामीं करूं लागेल तर त्यांत त्यांचें स्वतःचें व त्याबरोबरच राष्ट्राचेंही कल्याण आहे.