पान:मराठी रंगभुमी.djvu/26

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
मराठी रंगभूमि.

वे. शा. सं. रा. गोपिनाथशास्त्री आगाशे यांनीं शास्त्राचे पुष्कळ आधार दाखवून नटवेष घेणें हा दोष नाहीं असें सिद्ध केलें. यानंतर वरील मंडळी खजिल होऊन त्यांनीं भावे यांचें नांव सोडून दिलें, व पुढे त्यांचेपासून भावे यांस कधीं त्रास झाला नाहीं. याप्रमाणें श्री. आप्पासाहेब यांच्या आश्रयानें रा. भावे यांनीं आपल्या नाटकास चांगलें स्वरूप आणिलें. त्यांच्या नाटकांत काम करणारी बहुतेक मंडळी सांगलीचीच असून त्यांपैकीं कित्येक श्रीमंतांचे आश्रितही होते. त्यामुळे भावे यांस प्रथमतः खर्च फार आला नाहीं. शिवाय त्यांना चित्रे करतां येत असल्यामुळे नाटकास लागणारें किरीटकुंडलादि सामान त्यांनीं स्वत: तयार केलें. सीतास्वयंवर आख्यान केल्यावर एक वर्षात त्यांनीं रामायणांपैकीं दहा नाटकें तयार करून त्यांचे प्रयोग श्रीमंतांस दाखविले व श्रीमंतही ते प्रयोग पाहून खुष झाले; व नाटकांत सोंगें घेणाऱ्या कित्येक इसमांस बक्षिसें देऊन त्यांस त्यांनीं आपल्या पदरीं ठेवून घेतलें.*
 रा. भावे यांच्या नाटकाची पद्धत अशी होती:-


 * श्री. चिंतामणराव आप्पासाहेब हे गुणी लोकांचे फार चाहते होते, त्यामुळें अमुक एक गुणाचा मनुष्य त्यांच्या पदरी नव्हता असें नाहीं. शास्त्री, पंडित, हरिदास, गवयी, वगैरे सर्व लोकांचा तेथें भरणा असे. आप्पासाहेबांच्या औदार्याचीही मोठी ख्याती सांगतात. त्यांनीं पैसे मोजून कधीं दानधर्म केला नाहीं. मुठीच्या मुठी ते पैसे देत असें ह्मणतात.