पान:मराठी रंगभुमी.djvu/31

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७
भाग १ ला.

चार वर्ष बदली रजा देतों, तुह्मी गांवोगांव फिरून पैसे मिळवावे, असें भावे यांस कळविलें. भावे यांस आजपर्यंत नाटकाच्या धंद्यांत कांहीं मिळालें नसल्यामुळे, किंबहुना नाटकाकरितां कोणाचे हातउसने तर कोणाचे कर्जाऊ असे थोडेबहुत पैसे काढले असल्यामुळे व आपल्यास मदत करणारा आश्रयदाताही परलोकवासी झाल्यामुळे त्यांनीं मोठे यांची गोष्ट कबूल केली, व मंडळीसह बाहेर गांवीं स्वारीवर जाण्याचा निश्चय केला.
 भावे हे मंडळी घेऊन सांगलीहून जे निघाले ते प्रथम कोल्हापुरास आले. तेथे श्री आंबाबाईच्या देवळांतील गरुड मंडपांत व सरकारी वाडयांत कांहीं खेळ केल्यानंतर भाड्याची सोय करून ते पुण्यास आले. पुण्यास नाटकवाली मंडळी ही पहिलीच आलेली होती; व शास्त्री, पंडित, विद्वान् वगैरे लोकांचा तेथें पुष्कळ भरणा होता व त्यांस जरी नाटकांतील रहस्य कळत होतें तरी पुरुषानें नटवेष घेतलेला पाहूं नये अशी सर्वसाधारण समजूत प्रचलित असल्यामुळे नाटकाचे खेळास उत्पन्न फार होत नसे. त्यावेळीं पुण्यास नाटकें बुधवारच्या चौकांत किंवा आंबेकराच्या बोळांत उघड्या जागेवर मंडप घालून होत असत; व पुढें पुढें सांगलीकरांच्या वाडयांतही होऊं लागलीं. आतांप्रमाणें त्यावळीं खेळास तिकीट, प्रतिबंध वगैरे विशेष नसून खेळाचे जागीं पैसे घेऊन सोडीत असल्यामुळे दांडगाई पुष्कळ होत असे,