पान:मराठी रंगभुमी.djvu/44

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८
मराठी रंगभूमि.

इसम यांखेरीज समयस्फूर्तीनें कोणासही फारसें भाषण करतां येत नसे. बहुतेक सर्व पात्रें घोकंपट्टीच्या भट्टींतून निघत असल्यामुळें इकडचा शब्द तिकडे झाला कीं, त्यांची गाडी अडलीच ! या नाटकांत विदूषकाचें काम करणारे जे इसम असत ते बहुतकरून निरढावलेले असून त्यांच्या आंगीं प्रसंगावधान व समयस्फूर्ति चांगली असे.* तथापि ते सुशिक्षित नसल्यामुळें व विदूषकाचें काम ह्मणजे 'लोकांना हांसवायाचें' अशीच त्यांची समजूत असल्यामुळें सुखाचा प्रसंग असो की दु:खाचा प्रसंग असो, रंग चढेल की विरस होईल याची कल्पना न करितां कोणीकडून तरी ते लोकांना हांसवीत असत. त्या वेळी उत्तम विदूषक ह्मणून जे कांहीं इसम नावाजलेले असत त्यांत गंगाधर वाटवे, पांडु वाटवे, रामभाऊ साने, बाळा उंदीर,व्यंकणभट तासगांवकर हे होते. तथापि, सदर इसम


 * रा. गोपाळराव दाते हे विदूषकाचें काम करीत असतां त्यांनीं एकदां चांगलें प्रसंगावधान दाखविल्याची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदां तारामतीचें काम करणारें पात्र लहान असल्यामुळें शोक करीत रंगभूमीवर आडवें पडलें असतां त्याला तशीच झोंप लागली. त्यामुळें नाटकाचें काम बंद पडून फजिती उडण्याची वेळ आली. रा. दाते यांनीं विदूषकाचें सोंग घेतलेलेंच होतें. तेव्हां त्यांनी काहीं निमित्ताने मोठ्या खुबीनें त्या पात्राच्या पायाच्या आंगठ्यावर अशी अचूक उडी मारिली कीं, त्यानें इजा न होतां तें पात्र उठून आपोआप जागें होऊन भाषण करावयास लागलें!