पान:मराठी रंगभुमी.djvu/73

हे पान प्रमाणित केलेले आहे.
५७
भाग १ ला.


सारखी होती. एका पतीच्या अभावीं दुसरा पती करतांना प्रेमपाशांत गुंतून मनाची झालली चंचलता, पहिल्या पतीची आठवण होऊन हृद्यांत सुटणारें काहूर, व अखेर पहिला पती जिवंत आहे व त्याची आणि आपली भेट होत आहे, असें पाहून पूर्वीचा आपला अधीर स्वभाव, दुर्वर्तन, पश्चात्ताप वगैरे विकारांनीं मनांत उत्पन्न केलेला घोंटाळा हीं कामें रा. विनायकराव फारच बहारीचीं व हृदयास विव्हल करून सोडण्यासारखीं करीत होते. दुर्गा नाटकांत दुर्गेच्या खालेोखाल काळ्याचें काम आहे. हें काम त्यांच्या नाटकांत नांवाजलेले विदूषक रा. व्यंकणभट हे करीत असत. व्यंकणभट हे अगोदरच धीट व विदूषकाच्या नकला करून निरढावलेले असल्यामुळे त्यांनीं काळ्याचें काम हां हां ह्मणतां उचलिलें, व आवाज आणि अभिनय यांनीं हा कोणी खराच नोकर आहे असें ते प्रेक्षकांना भासवीत. पौराणिक नाटकांत विदूषकाच्या कामाला धरबंद नसल्यामुळे त्यांत हे पुष्कळ बीभत्सपणा करीत; पण दुर्गेसारख्या बुकिश नाटकांत बांधले गेल्यामुळे बीभत्सपणा न करतां काळ्याचें काम जेवढें व जसें व्हावयास पाहिजे होतें तेवढेंच हे करीत असत. हें नाटक या मंडळीस रा. देवल यांनीं स्वतः शकविलें होतें व त्यांच्याच शिक्षणानें ही मंडळी त्यांत तरबेज झाली होती.