पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/15

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





लेखन-स्वरूपात अधिक सुव्यवस्था, निश्चिती व सफाई असते. 'आधी बोलले गेले व मगच ते लेखनविष्ट झाले' हाच सिध्दांत शुद्धलेखनात उच्चारानुसारी लेखन मानण्याच्या प्रक्रियेत पाळला गेलेला दिसतो. म्हणून मो. के. दामले यांचे “एकंदरीत भाषासंग्रह, स्पष्टीकरण व सामान्य नियमांचे आविष्करण ही वैयाकरणाची मूळ कर्तव्ये होत. भाषेचे नियमन किंवा बंधन म्हणजे अपवादक गोष्टीस सामान्य नियमांचेच वळण देणे हा अव्यापारेषु व्यापार होय."(पृ. ७८). हे मत स्वीकारता येत नाही. कारण लेखनातील शुद्धाशुद्धता ठरवितांना सामान्य लोकांचे उच्चारण हा एक प्रमुख आधार आहे.
 डॉ. लीला गोविलकरांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे मराठी लेखनातील हा शुद्धाशुद्धातेचा विवेक करण्यासाठी पुढील सहा प्रमुख साधनांचा विचार करावा लागतो. १) उच्चार २) व्युत्पत्ती ३) लोकव्यवहार किंवा प्रचार ४) लोकपरंपरा किंवा त्या उच्चाराचा इतिहास ५) लोकव्यवहार व परंपरा यांमधून व्यक्त झालेली त्या विशिष्ट भाषेतील प्रवृत्ती ६) सोय किंवा सोपेपणा.
 एखाद्या ठराविक शब्दाचा उच्चार कसा केला जातो? त्यातील विविध लकबी कोणत्या? त्या शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय असू शकेल? तो शब्द आज कसा लिहिला जातो? पूर्वी कसा लिहिला जात होता? भाषेच्या प्रवृत्तीशी तो शब्द मिळता-जुळता आहे की नाही? त्याच्या लेखनात सुलभतेऐवजी अकारण बोजडपणा, क्लिष्टता आहे काय? या सर्वच दृष्टींनी शब्दाचा विचार करून मगच त्याचे लेखन ठरत असते.

शुद्धलेखनाची नियमावली


 मराठी शुद्धलेखनाच्या संदर्भात प्रामुख्याने हस्व-दीर्घ, अनुस्वार, शिवाय अन्य काही गोष्टी यांचा विचार करावा लागतो. त्यासाठी मराठी महामंडळाने तयार केलेल्या शुद्धलेखन नियमांचा आधार अधिकृत म्हणून घेणे आवश्यक आहे. ते नियम सोदाहरण समजावून घेणे आवश्यक आहे. शिवाय अपवाद मानले गेलेले शब्दही स्वतंत्रपणे लक्षात घेतले पाहिजेत.

१२...