पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





 दि. २० सप्टेंबर, १९६२ रोजी शासनाने एका ठरावाने, मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कारलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना मान्यता देऊन हे नियम ताबडतोब अंमलात आणण्याचा आदेश दिला. मराठी साहित्य महामंडळाच्या ज्या लेखनविषयक नियमांना शासनाने मान्यता दिली ते नियम पुढीलप्रमाणे आहेत.

क) अनुस्वार


नियम १) स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदा. तंटा, चिंच, आंबा,गंगा, घंटा, पंडित. अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही, पण मराठी (देशी) शब्दांच्या बाबतीत अनुस्वार शक्य तो परसवर्णाने दाखवू नये. मात्र संस्कृतातील शब्द मराठीत जसेच्या तसे आले आहेत ते (तत्सम) शब्द परसवर्णाने लिहावयास हरकत नाही.
नियम २) य, र, ल, व, श्, ष, स्, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल संस्कृतप्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा. उदा. सिंह, संयम, मांस, संसार, संस्था, संस्कार.
नियम ३) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा. उदा. लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे. हा अनेकवचनसूचक अनुस्वार अस्पष्ट उच्चार असतांनाही द्यावा. उदा. मुलांना, घरांस, गावांमध्ये, त्यांना, त्यांच्यामुळे इ.
नियम ४) वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.
थोडक्यात सांगावयाचे तर स्पष्टोच्चारित अनुनासिके व अनेकवचनी नामे व सर्वनामे यांच्या सामान्यरूपांवर येणाऱ्या अनुस्वारांशिवाय आता कोठेही



१३...