पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/19

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




व्याख्यान चांगले झालें' ऐवजी 'त्याचं व्याख्यान चांगलं झालं'. वक्त्याच्या तोंडचेच उद्गार असे लिहावेत. इतर ठिकाणी असे लिहू नये.
नियम १४) मराठीत रूढ झालेले तत्सम व्यंजनान्त शब्द अकारान्त लिहावेत क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान इत्यादी.
नियम १५) केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकर-पूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावे. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.
नियम १६) राहणे, पाहणे, वाहणे, अशी रूपे वापरावीत. रहाणे-राहाणे, पहाणे पाहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करतांना ‘राहा, पाहा, वाहा' याच्याबरोबरच रहा, पहा, वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही.
नियम १७) 'इत्यादी' व 'ही' (अव्यय) हे शब्द दीर्घान्त लिहावेत. 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा.
नियम १८) पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना हस्वदीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.

काही स्पष्टीकरणे

 मराठी साहित्य महामंडळाच्या शुद्धलेखनाच्या या १८ नियमांवरून पुढील महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे जाणवतात.
१) मराठीतील लेखन हे शक्यतो उच्चारानुसारी असावे. पाठवीत, वडील, वकील.
२) स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. चिंच, आंबा, खंड.

३) व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा व्युत्पत्तीने सिद्ध न होणारे अनुस्वार देऊ नयेत. नाव,गाव.



१६...