पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/27

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




होतात त्यांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात. इक, क, ना, ईय, ता, रा, कट, इत, दार, बाज, पणा, री, य असे प्रत्यय लावून तयार झालेले काही प्रत्ययघटित शब्द - दैनिक, रसिक, शेतकी, माणुसकी, मानवता, शिलेदारी, कौटिल्य, घटित, इच्छित, नातेवाईक, दुकानदार, गोडपणा, स्वकीय, दारुबाज, दवाखाना, शौर्य, धैर्य इत्यादी सांगता येतील.
 काही वेळा शब्द वा त्याच शब्दांतील काही अक्षरे पुन्हा-पुन्हा येतात अशा शब्दांना ‘अभ्यस्त शब्द' म्हणतात. उदा. मारामार, हळूहळू, चिल्लीपिल्ली, सरसर, टकटक, काळाकाळा.
 असे हे शब्दसिद्धी प्रकरण शुद्धलेखनासाठी अवगत असावे.

समारोप

 शेवटी 'गाता गळा व लिहिता हातवळा' हेच लक्षात ठेवले म्हणजे भाषा शुद्ध व चांगली लिहिणे ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे. यासाठी लेखनाचा, वाचनाचा खरा . सराव वाढविला पाहिजे. शासनमान्य मराठी शुद्धलेखन महामंडळाच्या नियमानुसार मुद्रित पुस्तकातील -हस्व - दीर्घ, अनुस्वार, विराम, इत्यादींचे अनुकरण करून वाचन, लेखन केल्यास शुद्धलेखनाची वेगळी तयारी करावी लागत नाही. शिवाय किरकोळ सुद्धा का असेना पण शंका आली की लागलीच शब्दकोशातून वा जाणकारांकडून शंका निरसन करून घेण्याची सवय लावल्यास सततच्या निदिध्यासाने शुद्धलेखन कला साध्य होईल.
 मराठी शुद्धलेखनावर प्रसंगोपात्त व अनेक प्रकारे लेखन झालेले आहे. या लेखनमध्ये लेखनशुद्धीची व लेखन विकासाची भूमिका आहे.

 मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेली अधिकृत शुद्धलेखनाची नियमावली हा या अभ्यासाचा पाया आहे. शुद्धलेखनाविषयक वादविवादाचा, मते आणि मतभेदांचा येथे विचार करण्याची सुतराम आवश्यकता नाही. मराठी शुद्धलेखनाचा विचार अंतर्भूत असलेल्या पुस्तकांची काही नावे शेवटी 'अभ्यासाच्या साधनात' दिलेली आहेतच.



२४...