पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




 उद्देशानंतर विधेय आले की, वाक्य तयार होते. उदा. : साखर गोड लागते. 'पक्षी उडतो' ही वाक्य जुळणी होते. क्रिये विषयीचा बोध क्रियापदाने होतो. म्हणून 'क्रियापद' हा वाक्यातील पूरक शब्द बनतो. महानुभाव शब्द वाङ्मयात क्रियापदे समर्थ आशय व्यक्त करतात. उदा. बीजे केले. प्रत्येक क्रियापदाने एकेक वाक्य बनते म्हणून ते वाक्यात असले पाहिजे. या क्रियापदाने समजणाऱ्या क्रियेचा कर्ता वाक्यातला दुसरा मुख्य शब्द होय. कर्ता आणि क्रियापद मिळून वाक्य बनते. जेव्हा क्रियापद सकर्मक असते तेव्हा कर्म घातल्याशिवाय वाक्यार्थ पूर्ण होत नाही. उदा. : गाय देते यात 'दूध' शब्द किंवा ऋग्ण पितो यात 'औषध' शब्द, ही कर्मे घालावी लागतात. म्हणजे क्रियापद सकर्मक असेल तर कर्ता, कर्म, क्रियापद हे तीन मुख्य शब्द वाक्यर्थ पूर्तीसाठी आवश्यक असतात. वाक्याचा हा अर्थ वाढविण्यासाठी इतर संबंधीत शब्द येऊ शकतात. उदा. : 'कावळा ओरडला' यात 'काळा कावळा आंब्याच्या झाडावर ओरडला' यात काळा कावळा आंब्याच्या झाडावर मोठ्याने ओरडला' असे इतर कर्ता कर्म क्रियापद संबंधित शब्द येऊ शकतात. मात्र वाक्यातील मुख्य शब्दाचा क्रमही कर्ता, मग कर्म, मग क्रियापद असा असावा. अर्थात शैलीदार, झोकदार वाक्यात मात्र हा क्रम बदलू शकतो. उदा. 'कलथून खांब गेला'. वाक्याची रचना म्हणजे त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद सांगून वाक्यातील सर्व शब्दांचे मूळ शब्द त्यांच्या जाती वगैरे माहिती आणि त्यांचा इतर शब्दांशी संबंध सांगणे यालाच वाक्य-विवेचन म्हणतात असे ना. वि. आपटे यांनी नमूद केले आहे.

 वाक्याच्या अर्थाची फोड करणे, हा व्याकरणाचा मूळ उद्देश असतो. त्याच्या पद्धती दोन आहेत. वाक्याचे मुख्य दोन भाग, त्या प्रत्येकाचे दोन पोटभाग याप्रमाणे वाक्याचे अवयव पृथक म्हणजे निराळे करुन दाखविणे यास वाक्य पृथकरण म्हणतात. वाक्यातील विविध शब्दांचा किंवा विविध घटकांचा परस्परांशी कोणता संबंध आहे ते स्पष्ट करून सांगणे यालाच वाक्य पृथकरण म्हणतात. वाक्य पृथकरणात वाक्याचे भाग पाहावयाचे असतात. त्यातील प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र विचार करावयाचा असतो. वाक्य पृथकरण ही



४८...