पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/24

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पक्षांची वाढ हा आपल्या प्रादेशिक संकीर्णतेचाच पुरावा होय. शिक्षणाचा प्राथमिक अधिकार, मोफत व सक्तीचे शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे आपले आजवरचे दुर्लक्ष हे सामाजिक असंतुलन व विषमतेचे कारण होय. ग्रामीण भागापेक्षा नागरीकरण, कृषीपेक्षा उद्योगप्राधान्य, सदोष परराष्ट्र धोरणामुळे संरक्षणावरील वाढता खर्च या सर्वांमुळे विकासकार्यापेक्षा प्रतिबंधात्मक बाबींवर आपणास मोठा खर्च करावा लागतो. लोकप्रतिनिधी, प्रशासन, शासन (सरकार) यांवर होणारा खर्च सरंजामीच होय. यामुळे वंचित घटकांना त्यांच्या विकासाचा अपेक्षित वाटा मिळाला नाही. परिणामी त्यांच्या प्रश्न व समस्यांचे स्वरूप दिवसागणिक गंभीर होत आहे. वाढती बेरोजगारी, लिंगभेद दरी, आर्थिक विषमता यांमुळे व नव्या जागतिकीकरणामुळे वंचित वर्गाचे जीव अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी स्थिती आहे. वंचित विकासाचा विचार ही फार पुढची गोष्ट ठरते.
वंचित बालकांची दुःस्थिती

 समाजात अनाथ, अनौरस, निराधार मुलांची संख्या आपणास नियंत्रित वा कमी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या संगोपन, शिक्षण, पुनर्वसनाची व्याप्ती वाढते आहे. संख्यावाढीच्या प्रमाणात संस्था, योजना व आर्थिक तरतूद वाढीबाबत आपण उदासीन राहिल्याने संस्थाबाह्य वंचित बालके गुन्हेगारी, अल्पवयीन शरीरविक्रय, अमली पदार्थांच्या वापरात वाहकाचे कार्य, बालमजुरी, बाल लैंगिक शोषण, रस्त्यांवर राहणा-या बालकांची वाढती फौज आपल्या कल्याण व विकास प्रश्नांचा प्राधान्यक्रम कार्यक्रम होऊ शकला नाही. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, गतिमंद, बहुविकलांग, मूकबधिर, बालकांचे संगोपन, उपचार, निदान, साधनपुरवठा, शिक्षण प्राधान्य, नोकरी, आरक्षण इत्यादी प्रश्नी आपली अनास्था म्हणजे आपल्या भावसाक्षरतेची दिवाळखोरीच! जग अपंगांच्या मानसिक उन्नयनाचं नियोजन करण्यात गुंतले असताना आपण अपंगांच्या भौतिक सुविधा विकासाचे सरासरी लक्ष्यही गाठू शकलो नाही. जी काही थोडी प्रगती झाली त्यात शासनाचा वाटा किती व स्वयंसेवी संस्थांनी केलेली गुणात्मक प्रगती किती याचाही केव्हा तरी विचार होणे गरजेचे आहे. कुष्ठरोगी, देवदासी, वेश्या यांची अपत्ये, दुभंगलेल्या कुटुंबातील मुले, नैसर्गिक आपत्ती, अपघातातील बळी बालके, दंग्यात, दहशतीत अनाथ, निराधार झालेली मुले, विस्थापित कुटुंबातील मुले (उदा. धरणग्रस्त, सेझग्रस्त इ.), बंदीजनांची अपत्ये, हरवलेली, टाकलेली, सोडलेली मुले, एड्सग्रस्त मुले अशा वंचित बालकांचे साधे सव्र्हेक्षण करून संख्यामान आपण गेल्या ७० वर्षांत निश्चित करू शकलो नाही. त्यांच्या संगोपन,

मराठी वंचित साहित्य/२३