पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/11

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     उपोद्घात.     

पाण्याचे सज्जनाच्या मनाशीं सादृश्य हीं आद्य कवीच्या कवित्त्वाची साक्ष देतात. वाल्मीकीनें जें कवित्व ह्या स्थळी दर्शविलें तेच कवित्व ज्या पुरुषाने पापाचा पंक ह्या शब्दानें प्रथम निर्देश केला त्याणे दाखविलें नाहीं काय?

 मागे आम्ही म्हटलेच आहे की, मनुष्याच्या मनाची उन्नति अथवा अवनति, चांगल्या गोष्टींकडे किंवा वाईट गोष्टींकडे कल वगैरे हीं शब्दांचे ठायीं प्रतिबिंबित झालेली आढळतात. तसेच शब्द कधी कधी मूळच्या चांगल्या अर्थापासून भ्रष्ट होऊन वाईट अर्थ पावतात किंवा मूळचा वाईट अर्थ सोडून नंतर चांगला अर्थ दर्शवू लागतात; शब्दाची व्याप्ति चांगल्यावर व वाईटावर समान असतां चांगल्यावरच किंवा वाईटावरच ती नियंत्रित केली जाते; आणि कार्य व कारण ह्यांचे निकट संबंध व साततिक साहचर्य यांवरून कार्यवाचक शब्द कारणवाचक होतो किंवा कारणवाचक शब्द कार्यवाचक होतो. ह्या सर्व प्रकारांची प्रतीति देणारे शब्द भाषेमध्ये अनेक असतात व मराठी भाषेमध्ये तर ते शेंकडों आहेत.

 छांदिष्ट, आर्ष, लाघवी, व्रात्य, साला इत्यादि अनेक शब्दांचे सांप्रतचे रूढ झालेले अर्थ व त्यांची व्युत्पत्ति हीं मनांत आणली असतां वरील विधानाविषयीं वाचकांची खात्री होईल. व्रात्य हा शब्द आपण द्वाड ह्या अर्थाने योजतो. परंतु त्याचा अर्थ नेहमीं समुदायांत असणारा असा आहे. संस्कृत व्रात (समुदाय ) ह्या शब्दापासून तो उत्पन्न झालेला आहे. परंतु जीं मुले घरांत बसून न राहतां नेहमी रस्त्यामध्ये पोरांच्या समुदायांत जातात ती तशा कुसंगतीच्या योगाने खोडकर होणे व आईबापांच्या योग्य नीतिमत्तेचा कित्ता उचलण्याविषयी पराङ्मुख अशी होणे हे सृष्टीच्या नियमास अनुसरूनच आहे.