हा शब्द एक चिरस्थायी खूण आहे, व आपण आपले दुष्ट मनोविकार आपल्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असले पाहिजे, असा उपदेशच जणों काय तो आपणास करितो.
वर आम्ही म्हटले आहे की, शब्द हे आस्थिनरूप इतिहास आहेत. ह्याचे उदाहरण म्हणून एक शब्द देतों, आपण फिरंगी हा शब्द यूरोपी लोकांस किंवा विशेषतः पोर्चुगीज लोकांस लावतों. हा शब्द कोठून व किती लांबची मुशाफरी करून आपणाकडे आला आहे, व ही मुशाफरी करण्यास त्याला किती काळ लागला, ह्याची कल्पना कोणास तरी आहे काय ? हा शब्द आपणामध्ये आला आहे तो अर्धी पृथ्वी वलांडून आला आहे. वाटेने येतांना त्याने पुष्कळ ठिकाणी मुक्काम केले, व ही मुशाफरी करण्यास त्याला वर्षे सुमारे दोन हजार लागलीं हैं ऐकून कोणास आश्चर्य व विस्मय वाटणार नाहीं ? परंतु इतकेच नव्हे. हा शब्द आपण त्याच्या जन्मभूमीस नेऊन पोंचवीतोंपर्यंत आपणास शेंकडों वर्षांचा, कित्येक राष्ट्रांच्या परिवर्तनाचा, अनेक देशांचा, मोठ मोठ्या युद्धांचा, अनेक क्रूर व अमानुष कृत्यांचा व अनेक साहसी पुरुपांचा इतिहास विदित होऊन आपलें अंतःकरण विस्मयाने व आश्चर्याने थक्क होऊन जाते.
पूर्वी म्हणजे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकांत जर्मनीमध्ये एक जनसमूह असे. तो आपणास फ्रांक लोक असे म्हणवीत असे. फ्रांक ह्याचा अर्थ स्वतंत्र. हे लोक स्वतंत्रताप्रिय असून शिवाय स्वतंत्रही होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकांत रोमच्या बादशाही अमलाचा ऱ्हास होऊन त्या राज्याची शकलें झाली तेव्हां गाल देशाने रोमन लोकांचे स्वामित्व झुगारून दिले. परंतु ही संधि साधून वर सांगितलेल्या फ्रांक लोकांनी