पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/20

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

पायावर उभारलेली जी कल्पना तिला आम्ही काव्य असे म्हणतों. मग ही कल्पना वाक्यात्मक असो किंवा एक शब्दात्मक असो. ती कल्पना एका शब्दामध्येच असली तर तो शब्दसुद्धा काव्य हे अभिधान पावू शकतो. आम्ही कल्पनेला मनोहर सादृश्याचा किंवा मनोहर आरोपाचा किंवा मनोहर आतिशयोक्तीचा पाया पाहिजे असे वर म्हटले आहे, त्यांत मनोहर हा शब्द महत्त्वाचा आहे. सादृश्य जर साधे असले किंवा आरोप जर साधा असला, किंवा अतिशयोक्तिं साधी अथवा नीरस असली तर तेथे काव्य ह्या शब्दाची योजना करतां यावयाची नाहीं. 'पाकोळीचे तोंड माणसाच्या तोंडाप्रमाणे असते ' ह्या वाक्यांत पाकोळीचे तोंड व माणसाचे तोंड ह्या दोहोंमध्ये सादृश्य वर्णिलेले आहे. परंतु ह्या सादृश्यामध्ये मनोहरपणाचा अभाव असल्याकारणाने त्यास काव्य म्हणता यावयाचे नाहीं. निर्जीव वस्तूवर सजीवत्वाचा आरोप किंवा सजीव वस्तूवर निर्जीवित्वाचा आरोप जर मनोहर रीतीने केलेला असेल तर तो आरोप काव्य ह्या अभिधानास पात्र होऊ शकेल. ह्यावरून वाचकांस कळन येईल की, काव्याची निष्पत्ति होण्यास अनेक शब्दांची आवश्यकता आहे असें नाहीं. एकाएका शब्दानेसुद्धा काव्याची निष्पत्ति होऊ शकेल, आणि काव्य करणाऱ्या कवीच्या कवित्वाचा प्रादुर्भाव एका एका शब्दांतसुद्धा होऊ शकेल. सूर्याचे प्रतिबिंब विस्तीर्ण महासागरावर साकल्याने पडलेले जसे दृग्गोचर होते, तसे ते एका लहानशा जलबिंदूवरही पडलेले दृष्टीस पडते. त्याप्रमाणेच मोठमोठ्या ग्रंथांत कवींचे कवित्व जसे प्रतिबिंबित झालेले असते, तसेच ते एकएकट्या शब्दांतसुद्धां प्रतिबिंबित झालेले असते. परंतु मुक्तेश्वर, मोरोपंत इत्यादिकांच्या कृतींमधील कवित्वानें आपलें अंतःकरण जसें