पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/25

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण पहिलें.     २३

आणि कवित्वाचे गांभिर्य ही केवढी असावी ? या पुरुषाचेठायीं कवित्व नव्हते असे कोण म्हणेल?

 एखाद्या लाक्षणिक शब्दाचा पूर्ण अर्थ जाणावयाचा असल्यास, आपण त्याच्या मूळच्या अर्थाचे नीट मनन करून त्या अर्थाचा नकाशा आपल्या चर्मचक्षुने किंवा अंतश्चक्षूने पाहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्या शब्दाचा जोरदार अर्थ आपल्या मनावर चांगला ठसतो. शब्दांच्या उत्पत्तीचा चांगला अभ्यास करून प्रत्येक शब्दास हल्लीचा अर्थ कसा प्राप्त झाला हे आपण लक्षपूर्वक पाहूं लागलों, तर शब्द व त्यांचे अर्थ हे आपल्या मनांत चांगले ठसतील; आणि तेणेकरून अनमानधबक्याने, अनिश्चितपणाने व अस्पष्ट रीतीने शब्दांचा अर्थ करण्याची वाईट चाल नाहीशी होईल. तसेच त्यापासून भाषणांत व लिहिण्यांत योग्य प्रसंगी योग्य शब्द घालण्याची संवय लागेल व भाषा ही सोने जोखावयाच्या तराजूप्रमाणे सूक्ष्म भेद दाखविण्यास समर्थ होईल, शब्दाच्या हल्लीच्या अर्थाचा मूळच्या अर्थाशी कोणच्या प्रकारचा संबंध आहे हे जाणण्याचा प्रयत्न केल्यापासून आपल्या मनांतील विचारांचा अस्पष्टपणा नाहीसा होऊन त्यांस स्पष्टपणा कसा येतो हे दाखविण्यासाठी आम्ही एक उदाहरण घेतों.

 ३. उडाणटप्पू.- उडाणटप्पू हा शब्द सर्वांस ठाऊक आहे. त्याचा अर्थही सर्वांस ठाऊकच आहे. जो कोणी एका विषयावर फार वेळ गुंतून न राहतां एकावरून दुसऱ्यावर व दुसऱ्यावरून तिसऱ्यावर जातो तो, स्थिर, चंचळ, हाती घेतलेले कोणतेही काम पुरतेपणी करीत नाहीं तो, असा अर्थ उडाणटप्पू याचा आहे. परंतु ह्या शब्दाची व्याप्ति स्पष्टपणे दाखविणाऱ्या मर्यादरेषा आमच्या वाचकांस ठाऊक आहेत काय? कदाचित नसतील. मोलस्वर्थने ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयीं ‘उडाणटप्पू