पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/27

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     प्रकरण पहिलें.     २५

 ४. अजागळ.- अजागळ हाही शब्द मोठ्या चमत्कारिक रीतीनें उत्पन्न झाला आहे. त्याचा अर्थ निरुपयोगी, बेअकली, मूर्ख मनुष्य असा आहे. संस्कृतांत एक सुभाषित श्लोक आहे.

 धर्मार्थकाममोक्षाणां यस्यैकोऽपि न विद्यते ।
 अजागलस्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम् ॥

 शेळीच्या गळ्यांत लटकत असलेले स्तन निरुपयोगी, बेडौल असे असतात. त्यावरून निरुपयोगी व बेअकली मनुष्यावर अजागलस्तनत्वाची जोरदार आरोप केला जाऊन, तशा मनुष्याला अजागल म्हणण्याचा परिपाठ पडला. हा शब्द प्रथम संस्कृतज्ञांनी रूढ केला. पुढे तो आपल्या अंगच्या जोरदारपणामुळे सर्वतोमुखी झाला. तेव्हा मूळचा शब्दार्थ लोकांस न समजल्यामुळे अजागलस्तन ह्यांतील शेवटची दोन अक्षरे गळून जाऊन त्यास अजागळ असे आटपसर रूप प्राप्त झालें. अजागल शब्दाची ही व्युत्पत्ति समजली असता, त्या शब्दाचा जोरदारपणा किती स्पष्ट रीतीने मनावर ठसतो ?

-----

खरी असावी असे आहे. कारण “ चुकारतट्टू" हा "उडाणटप्पू" ह्याशी बहुतांशी समानार्थक शब्द असून तट्टाच्या अस्थिरपणावरून त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. दुसरे असे की “ उडाणटप्पू” ह्या शब्दाच्या अर्थाच्या घटक कल्पना वेगळ्या करून उडता तट्टू, उडणारा तट्टू वगैरे सारखे प्रयोग अस्थिर मनुष्याच्या संबंधाने केले जातात. आतां तचा ट कसा झाला हे सांगणे राहिले. मूर्द्धस्थानचा “ण” अगोदर उच्चारून नंतर दन्त्य “ त" उच्चारण्यास जिव्हेस कठिण पडून संध्वाननाच्या ( assimilation ) नियमाप्रमाणे “त” चा " ” झाला. परंतु एका "ट " च्या पुढे आणखी दोन “ ट” उच्चारणे हा कर्कश ध्वनि असल्याकारणानें विध्वाननाच्या नियमास अनुसरून “ट्टू” चा “प्पू' झाला. संध्वानन व विध्वानन ह्यांचे व्यापारांची उदाहरणे सर्व भाषांमध्ये विपुल आढळतात.