पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण पहिलें.     २७

उघडते, टवटवीत चिमुकल्या शाखा उभारते, आणि पुन्हा प्रसन्न मुद्रेनें पर्यंतभागच्या उपवनप्रदेशास शोभवू लागते. ह्या वनस्पतीच्या अशा शालीन वर्तनावरून तिचे "लाजाळू " असे नांव ज्याने ठेविलें, त्याने नवोढेशीं तिचे सादृश्य कसे चटकदार रीतीने वर्णिले आहे ? नवोढेची मुख्य खूण लाजणे ही होय. आपल्या बायका भित्र्या मुलांस नेहमी म्हणतात, " असा नव्या नवरीसारखा लाजतोस काय?"

 ७. नमस्कारी. -ह्याच वनस्पतीस संस्कृतांत नमस्कारी असे नांव आहे. हे देखील कवित्वगर्भच आहे. नमस्कार करतेवेळीं ज्याप्रमाणे आपण दोन हात जुळवून अजलि करून खाली वांकतों, त्याप्रमाणे ही वनस्पति आपली लहान लहान पाने दोन बाजूंनी आणून जुळविते, आणि शाखा वांकविते, तेणेकरून ती जणों काय नमस्कार करीत आहे असा भास होतो. उद्धट, द्वाड, भयंकर अशा निवडुंगाच्या झाडाप्रमाणे ही लाजाळू बेपर्वाई व मगरुरी दाखवीत नाही, तर उलटपक्षी नम्रपणा दाखविते. ह्या तिच्या शालीन आचरणावरून तिच्याठायीं सचेतनत्वाचा आरोप करून अति गोड नांव नमस्कारी असे ज्याणे दिलें त्याणे ह्या नांवामध्ये बरेंच कवित्व व्यक्त केले आहे. पुष्कळ वनस्पतींचे वाचक शब्द त्या त्या वनस्पतीचे, गुण, धर्म, आकार, स्वरूप इत्यादिकांची माहिती करून देणारे असतात.

 ८. दिपमाळ.-तुलसीकुलामध्ये दिपमाळ म्हणून एक झाड आहे. ते पुष्कळांनी पाहिलेले असेल. त्याला असे नांव पडण्याचे कारण हें की, देवळासमोरील दिपमाळेशी ह्या झाडाच्या मंजरीचे साम्य आहे. देवळासमोरील दिपमाळ उंच व निमूळती असून सभोंवार चक्राकार ( दिवे ठेवण्यासाठी ) लहान लहान पायऱ्यांच्या आकाराचे दगड असतात. त्याचप्र-