पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण दुसरें.     ५३

तात. असो, सांगावयाचे म्हणून इतकेंच कीं, बीभत्स व ओंगळ वस्तूंचे वाचक शब्द साततिक साहचर्यामुळे कालांतराने ग्राम्य ठरतात व मनुष्यांस प्रतिष्ठित संभाषणांत योजण्यास दुसरे कोणते तरी विप्रकृष्ट शब्द म्हणजे त्या वस्तूंचा दुरून दुरून निर्देश करणारे शब्द शोधावे लागतात; परंतु बीभत्स व अमंगळ वस्तूचा निर्देश करण्यासाठी प्रथम कितीही विप्रकृष्ट म्हणजे दूरचा शब्द योजला तरी कालांतराने असे होते की, ती बीभत्स वस्तु व तिचा वाचक जो विप्रकृष्ट म्हणजे अर्थात प्रतिष्ठित शब्द ह्या दोघांचे साततिक साहचर्य झाल्यामुळे त्या वस्तूचा बीभत्सपणा क्रमानें त्या शब्दाचे ठायीं येतो. असे झाले म्हणजे, हा विप्रकृष्ट व प्रतिष्ठित शब्द संनिकृष्ट व ग्राम्य ठरतो, व त्या बीभत्स वस्तूचा प्रतिष्ठितपणे निर्देश करण्यासाठी लोकांस आणखी एकादा शब्द हुडकावा लागतो. आश्चर्याची गोष्ट ही की, असा शब्द शोधण्यासाठी त्यांना कांहीं प्रसंगी तर लांब सुद्धां जावे लागत नाहीं. प्रथम प्रतिष्ठित म्हणून प्रचारांत आणलेला पण नंतर अप्रतिष्ठित ठरलेला शब्द प्रचारांत येण्याचे आधींचा जो अप्रतिष्ठित शब्द तेच बहुत काळपर्यंत कानावर न आल्याकारणाने त्याच्या ठायींचा बीभत्सपणा लोपलेला असतो व तोच आतां प्रतिष्ठा पावून प्रचारांत येतो. कुस्ती खेळतांना ज्याप्रमाणे एका मल्लास दुसरा मल्ल खालीं पाडतो, व आपण त्याच्यावर बसतो, इतक्यांत खाली पडलेला मल्ल उठून आपल्या प्रतिपक्षास खालीं पाडून आपण त्याजवर बसतो, तो पुन्हा खाली पडलेला पुन्हा उठून दुसऱ्यास पाडतो, त्याप्रमाणे शब्दांचे माहात्म्य व प्राबल्य वाढते किंवा कमी होते. एका शब्दाने दुसऱ्यास पदच्युत करावें, दुसऱ्याने पहिल्यास, पुन्हा पहिल्याने दुसऱ्यास, ह्या