पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण दुसरें.     ५७

योजतों. वाईट मनुष्याच्या अंगी नैतिक धैर्य असल्यास तोही आपले खरे स्वरूप जगास दाखविण्यास अनमान न करणारा असा असेल; परंतु तसा अर्थ बालबोध ह्या शब्दाचा न करतां आपण चांगल्या मनुष्याच्या संबंधानेच तो योजतों. चांगल्या चालीचा, साधा, छक्केपंजे न करणारा जो मनुष्य त्यासच आपण बालबोध म्हणतों. ह्या अर्थाने बालबोध हा शब्द आपण बालबोध लिपी व मोडी लिपी ह्यांच्यांतील भेद मनांत आणून प्रथम योजू लागलों हे सांगणे नकोच.

 ३६. त्वंपुरा.- त्वंपुरा हा शब्द निंदाव्यंजक शब्द उच्चारण्याविषयींची आपल्या मनाची खंती दाखवितो. त्वंपुरा ह्याचा अर्थ “बोंब, शंख अथवा फजीती" असा आपण करतों. ह्याचा उपयोग पुढील सारख्या प्रसंगी होतो. “मी तुला सांगत नव्हतों की तुझी परीक्षा जवळ आली आहे; पत्ते खेळण्यांत, चकाट्या पिटण्यांत आपला वेळ गमावू नको म्हणून? पण माझे ऐकतो कोण? तुझा आपला क्रम चालला होताच, आतां परीक्षेत तुझा त्वंपुरा वाजला ! वाजायचाच !" त्वंपुरा ह्या मराठी शब्दाच्या पोटांत दोन संस्कृत शब्द आहेत. ते " त्वं " आणि “पुरा” हे होत. ह्यांचा अर्थ अनुक्रमें तूं आणि पूर्वी असा आहे व त्यांपासून “शंख" असा अर्थ कसा व्हावा? आपल्या पूजेमध्ये शंखाचे वर्णन आहे ते असे:-

  त्वं पुरा सागरोत्पन्न विष्णुना विधृतः स्वयं ॥
  नमितः सर्वदेवानां पांचजन्य! नमोऽस्तु ते ॥ १ ॥

 "तू पूर्वी सागरापासून उत्पन्न झालास; विष्णूनें स्वतः तुला स्वीकारलें; सर्व देव तुला नमितात ; हे शंखा, तुला नमन असो." असा ह्या श्लोकाचा अर्थ असून, शंख शब्द न उच्चारतां त्याच्या वर्णनांतील पहिले दोन