पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/6

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मराठी शब्दांचे उद्घाटन.

गांभीर्य इत्यादि गुण अधिक प्रमाणाने असून तिच्या ठायीं मातेचे प्रतिबिंब बऱ्याच साकल्यानें उमटलेलें आहे, आणि तिला फारशी व अरबी इत्यादि भाषांची उत्कृष्ट पुष्टि मिळून ती आजमितीस बऱ्याच समृद्ध दशेस येऊन पोहोचली आहे.

 अशा ह्या मराठी भाषेच्या शब्दांचा अभ्यास करणे म्हणजे शब्दांची व्युत्पत्ति शोधून काढणे, नवीन शब्द कोणच्या द्वारांनी व कोणच्या प्रसंगी प्रथम प्रचारांत आले, व ते ते शब्द आपण भाषेमध्ये कोण कोणच्या कारणांनी अंतर्भूत करून घेतले, शब्दांचे अर्थ बदलण्याची कारणे काय काय झालीं वगैरे गोष्टी सप्रमाण ठरविणें हें मेहनतीचे व दीर्घोद्योगाचे काम आहे. परंतु सृष्टीचा असा नियम आहे की, ज्या मानाने मेहनत व दीर्घोद्योग ह्यांचे कोणत्याही कामामध्ये अवलंबन करावें त्या मानानेच फलनिष्पत्ति आनंददायक असते. मराठी शब्दांचा अभ्यास आमच्या वाचकांपैकी जे कोणी करण्यास प्रवृत्त होतील त्यांस त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे लाभ व मनोरंजन हीं प्राप्त होतील. शिवाय त्यांस प्रसंगविशेषीं असेही आढळेल कीं, सबंध काव्याच्या वाचनापासून होणारें मनोरंजन एका एका शब्दानें होते; सबंध इतिहासग्रंथापासून मनावर पडणारा प्रकाश एका एका शब्दापासून पडतो, मानसशास्त्रावरील एकाद्या समग्र ग्रंथापासून मानसिक विकारांचे प्रतीतीस येणारे सापेक्ष प्राबल्य हे एका एका शब्दाने प्रतीतीस येते. असा जर शब्दांच्या अभ्यासाचा महिमा आहे, तर हा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मनुष्यास निरुत्साह होण्याचे कांहीं कारण नाहीं, हें उघड आहे.

 भाषेतील शब्दांस आम्ही आस्थिनांची उपमा देतों. हजारों वर्षांमागे जे प्राणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर संचार करीत असत, किंवा ज्या वनस्पति पृथ्वीच्या पृष्ठभागास शोभायमान करीत