आपल्या भाषेतील अरबी व फारशी शब्द सहज वरवर जरी चाळले तरी दुसरी एक गोष्ट आपणांस कबूल केल्याविना गत्यंतर नाहीं; ती ही कीं, मुसलमानी लोक आपल्यापेक्षा अधिक ऐषआराम करीत असत. त्यांचा ऐषआरामही त्यांच्या अंगांत अगदीं खिळून गेला होता व त्यांचे ऐषआरामाचे कांहीं प्रकार तर आपणांस अगदी अश्रुतपूर्व असे होते. अत्तर, अंबारी, आषक, आषुक, माषुक, इष्की, ऐषआराम, किंतान, ख्याल, जवाहीर, नक्षी, तबक, तसबीर, तजेला, खुबसुरत, बिदागी, नजराणा, मौज, नूर, तंबुरा, मखमाल, मिना, मेहरप, महाल, इत्यादि शब्दांवरून वर सांगितलेले अनुमान आपणांस सहज करता येते. मराठी भाषेत सामील झालेल्या पारशी व आरबी शब्दांवरून दुसरे असेंही एक अनुमान आपणांस सहज करता येणारे आहे की, सरकारच्या सर्व बाबींचे दफ्तर मुसलमानीमध्ये ठेविले जात असे. कारण हे दफ्तरी शब्द आपल्या भाषेमध्ये भरपूर आहेत. दफ्तर, हिशेब, जमा, खर्च, रकाना इत्यादि. आपणांवरील मुसलमानी अंमल नाहींसा झाल्यावरसुद्धा त्याच पद्धतीवर मराठे व पेशवे ह्यांचे दफ्तर ठेविले जात असे; अजूनसुद्धां-म्हणजे इंग्रजी अमलांतसुद्धां-देशी भाषेतील दफ्तर त्याच पद्धतीवर ठेवले जात आहे. हल्ली सन मात्र येशूख्रिस्ती चालतो.
ह्याशिवाय दुसराही एक मोठा महत्वाचा मुद्दा आपणांस कळतो; तो हा कीं, मुसलमानी लोक हे आपणांपेक्षां कांहीं प्रकारच्या कलाकौशल्यांत अधिक प्रवीण होते. कांहीं कलाकौशल्ये जी आपणांस मुळीच ठाऊक नव्हती, ती त्यांनी आपणांस शिकविलीं व बांधकामांची त्यांची शैली आपल्या शैलीपेक्षां भिन्न असून ती आपल्याइतकी व कांहीं बाबतीत आपणां-