पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/85

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ८३

आतां आपल्या प्राचीन पद्धति व आचारविचार, अभ्यासक्रम वगैरे हीं शब्दांवरून कशी व्यक्त होतात हे पाहूं.

 श्रुति ह्या शब्दावरून प्राचीन काळचा अध्ययन व अध्यापन पद्धति ही कशी होती हे समजते. " श्रुति " म्हणजे ऐकून संपादावयाचे ज्ञान. “श्रुति " हा शब्द वेदास लावतात. यावरून प्राचीन काळीं पुस्तकावरून अध्ययन करण्याची चाल नसे असे सिद्ध होते. आपले वेद सुमारे ४००० वर्षांपूर्वी रचले गेले, तथापि त्यांत एका अक्षरासंबंधाने किंवा यःकश्चित् कान्यामात्रासंबंधाने पाठभेद नाहीं; यावरून तरी हीच गोष्ट सिद्ध होते. पुस्तकांत लिहिलेला लेख लेखकाच्या निष्काळजीपणामुळे अशुद्ध होतो; परंतु गुरूच्या मुखांतून निघालेला पाठ केवळ कानांनीच ऐकून ग्रहण करावयाचा असतो, ह्यामुळे शिष्यास चित्ताची एकाग्रता करावी लागते व एकाग्रचित्ताने ग्रहण केलेला पाठ शुद्ध असून शिवाय लवकर पदरांत पडतो. अशा रीतीने मागपासून गुरुपरंपरेनें वेदपठण आजपर्यंत चालत आले आहे. पुस्तकांतून पठण करण्याची पद्धति जुन्या लोकांनी निंदिलेली आहेः---
  गीती शीघ्री शिरःकंपी तथा लिखितपाठकः ।
  अनर्थज्ञोऽल्पकंठश्च षडेते पाठकाधमाः ॥

 उपनयन, विवाह ह्या शब्दांवरून आपल्या लोकांच्या प्राचीन सांसारिक आचारांची परिस्फुटता होते. "उपनयन " म्हणजे “ जवळ नेणे." प्राचीन काळीं मुलाची शैशवावस्था अवसित झाली म्हणजे त्यास विद्योपार्जनासाठी गुरूकडे नेत असत व हाच गुरु त्या मुलाची मुंज करीत असे. मुंज झाल्यावर गुरूचे आश्रमीच हा मुलगा कांहीं काळपर्यंत राहत असे व त्याची सेवा करून विद्योपार्जन करीत असे. ते संपूर्ण झाल्या-