पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०६ )

आपल्या राज्याच्या सर्व भागांतून सैन्य एकत्र गोळा केले; आपल्या राज्यांतील सर्व लढवय्या सेनानायकांना एकत्र जमवून आणिलें, व त्यांना आपल्या बरो- बर घेऊन त्यानें महाराष्ट्र देशावर स्वारी केली; परंतु त्याला अजूनही महाराष्ट्र देश जिंकून आपल्या स्वाधीन करून घेता आला नाहीं; " तो पुढे म्हणतो:- महाराष्ट्राचा परिधी ६००० लीग म्हणजे अजमासे बाराशे मैल असून त्याच्या एकट्या राजधानीच्या शहराचाच परिधि तीस लीग म्हणजे अजमासे सहा मैल आहे, व त्याच्या पश्चिम बाजूस एक मोठी नदी वहात आहे. या प्रदेशांतील जमीनी सुपीक व उत्तम असून तिच्यांतून मुबलक धान्य उत्पन्न होते; या देशाची हवा ऊष्ण आहे. येथील लोकांचे रीतिरिवाज साधे असून हे लोक प्रामाणीक आहेत; ते बांध्याने उंच असून स्वभावाने पाणंदार व अभिमानी आहेत; जो कोणी प्रसंगी त्यांच्या उपयोगी पडतो, किंवा साह्य करितो, त्याच्या बद्दल ते निःसंशय कृतज्ञभाव ठेवितात; परंतु जो कोणी त्यांनां चीड येण्यासारखें कृत्य करितो, त्याचा ते सूड उगविल्या शिवाय कधीं ही स्वस्थ रहात नाहींत; आणि जर कोणी त्यांचा उपमर्द केला, तर त्या अपमानचा डाग घालविण्याकरितां ते आपले प्राणही धोक्यांत घालण्यास भीत नाहींत. संकटांत सांपडलेल्या कोणत्याही मनुष्याने त्यांची मदत मागितली तर ते त्याला लागलीच मोठया तत्परतेनें मदत करितात; इतकेंच नाहीं तर अशा प्रसंगी आपल्या जिवाचं काय होईल या गोष्टीचाही ते विचार करीत नाहींत; आपल्या एखाद्या शत्रून केलेल्या अपकारा बद्दल त्याचा सूड घ्यावयाचा असला तर तो बेसावध असतां न घेता त्यास पूर्वसुचना करून नंतरच वेतात. त्यावेळी प्रत्येकजण आपल्या अंगांत चिल- खत चढवितो, आणि आपल्या हातीं भाला घेऊन अपकाराचा सूड घेतो. युद्ध भूमीवरून शत्रू पराभूत होऊन पळाल्यास ते त्याचा पाठलाग करितात; पण जे त्यांना शरण येतात, त्या लोकांना ठार न मारितां ते अभय देतात. युद्धांत सेनानायकाच्या चुकीमुळे, अथवा निष्काळजीपणामुळे पराभव झाला तर ते त्या सेनानायकास शरीरदंडाची शिक्षा न देतां बायकांची वस्त्रे नेसवितात, व त्या अपमानामुळेच त्यास जीव देणे भाग पडते. राज्यकर्त्याच्या पदरीं आपल्या जिवाची यत्किचित ही भीती वाटत नसलेल्या योध्यांचा मोठा संग्रह असून हे सेना धुरंधर जेव्हा युद्धाकरितां सज्ज होतात तेव्हां प्रत्येक प्रसंग, निशा यावी म्हणून मद्य प्राशन करितात; मग अमलानें धुंद झालेल्या ह्या