पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११५ )

सशा प्रकारचा हा समारंभ होता. त्यानंतर, अदिलशहानें, पुर्णे, सुपें, इंदापूर, बारामती, व चाकण, वगैरे प्रांताची जी जहागीर निजामशाहीतून शहाजीकडे चालू होती तीच, त्याच्याकडे चालू ठेविली. आणि निजामशाहीतील, भिमा च निरा या दोन नद्यांच्या मधील मोंगलाकडून मिळालेल्या नवीन प्रदेशाची व्यवस्था लावण्याकरतां मुरार जगदेव x याच्या मदतीस त्यास पाठविलें. शहाजीस या प्रदेशाची उत्तम माहिती होती; त्यामुळे मुरारपंतास त्याचा अतीशय उपयोग झाला; व ही कामगिरी शहाजीनें उत्तम प्रकारें बजाविली. याबद्दल मुरारपंतानें त्याची शहाजवळ अतिशय तारीफ केली. त्यानंतर शहानें कर्नाटक व द्रवीड प्रांतांतील जो नवीन प्रदेश त्यास मोंगलाकडून मिळाला होता त्याचा बंदोबस्त करून तिकडील व्यवस्था लावण्याकरितां रणदुल्लाखान यास तिकडे पाठविले. तेव्हा त्याच्या हातांखाली शहाजीस नेमून त्याचीही तिकडे रवानगी केली ( इ. सन १६३७ ). त्यावेळी नारो त्रिंबक हणमंते यास त्याने आपला कारभारी म्हणून बरोबर नेलें होतें. कर्नाटक प्रांती गेल्या- चर रणदुल्लाखान यानें तिकडील मुख्य पाळेगार केंपगौडा याच्यावर स्वारी केली. तींत त्याचा पूर्ण पराभव केला; त्यास सावनदुर्गच्या + किल्लयांत हांकलून लाविलें; कावेरी नदीच्या उत्तरेकडील सर्व प्रदेश जिंकून घेतला; व त्याचें राहाण्याचे मुख्य ठिकाण बंगळूर, इस्तगत करून घेऊन तेथेंच तो राहूं लागला (इ. सन १६३८). या मोहिमेत शहाजीनें उत्तम कामगिरी बजाविल्यामुळे अदिलशहानें त्यास कर्नाटक मधील बंगळूर, कोलार, होसकोट (ऊसकोटा), दोड्ड-


 x मुरार जगदेव व वजोर खवासखान, या उभयतांना महंमद अदिलशहा यानें इ० सन १६३५ मध्ये ठार मारिलें; त्यामुळे जरी मराठी बखरीत मुरारपंताचें नांव दिले आहे तरी हा दुसरा कोणी सरदार असावा असे दिसते.

 + सावनदुर्गचा डोंगरी किल्ला म्हैसूर प्रांतांत बंगलोर जिल्ह्यांत असून तो समुद्रसपाटीपासून अजमायें ४०२४ फूट उंचीवर आहे. व त्याचें मागाडी ( Magadi) हें स्थानिक नांव असून या किल्लयाचा घेर अजमास आठ मैलांचा आहे.