पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२८ )

आधीपासूनच शहाजीविषयी साशंक होता; "शहाजी स्वतंत्र होऊन आप णावर उलटेल " ही जी महंमदशहाची फारा दिवसांची भीति, तो खरी झाली, असे त्यास वाटू लागले; आणि शिवाजीनें अदिलशाही प्रदेशामध्ये माजविलेल्या धुमाकुळामुळे तर त्याची तशी निःसंशय खात्रीच होऊन गेली. शिवाजीनें गेल्या दोन वर्षांत, म्हणजे इ. सन १६४६ व १६४७ मध्यें, चाकणपासून शिरवळपर्यंतचा पुण्याच्या लगतचा दक्षिणोत्तर प्रांत इस्तगत करून घेतला, आणि कांगोरी, तुंग, तिकोना, भोरप, कावरी, लोहगड, राज- माची, पुरंदर, सिंहगड, रायरेश्वराचा डोंगर इत्यादि घाटमाथ्यावरील किल्ले काबीज करून घेतले. यामुळे अदिलशाही दरबारांत मोठीच खळबळ उडून गेली होती; इतक्यांतच मुल्ला अहंमद यानें विजापूर येथे येऊन कल्याण प्रांतांत घडलेली सर्व हकीकत अदिलशाहास कळविली. त्यामुळे त्यास अती- शय राग आला; शिवाजीच्या ह्या बंडाळीस शहाजीची अंतस्थरीत्या फूस आहे, असे त्यास वाटू लागलें; शहाजी व शिवाजी या उभयतांनी संगनमत करून अदिलशाही सत्ता झुगारून देण्याचा इरादा खास धरिला, असा शहाच्या मनाचा निश्चय झाला, आणि पहिल्याने शहाजी व नंतर शिवाजी अशा क्रमाने उभयतांनाही चिरडून टाकावें, असे विचार त्याच्या मनांत निश्चितपणें घोळूं लागले.

 तथापि या दोन्हींही गोष्टी अदिलशहाच्या शक्तीबाहेरच्या होत्या; कर्नाटक- मधील मुस्तफाखान व सिद्दी रेहान यांच्या हातांखालील सैन्य चंदीकडे गुंत लेलें होतें, आणि तेही शहाजीशी सामना करण्याच्या तोलाचें नव्हतें व कांहीं सैन्य मोंगलांच्या हद्दीवर किल्लोकिल्ली पसरलेलें होतें, तें तेथून इल- विण्याची सोय नव्हती अशा दुर्बल स्थितीत, " कपटयोजना " एवढाच काय तो एक मार्ग शिलक राहिला होता; तथापि आपणाला भारी असलेल्या प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याकरितां, कपटयोजना करतांना, यशाची खात्री असली तरी सुद्धां दुर्बलांना विचारच करावा लागतो; व सख्तीचा इलाज करण्याची ताकद नाहीं, व साध्या इलाजानें काम होत नाहीं, तेव्हां आतां कपट योजना केल्याखेरीज दुसरें गत्यंतरच राहिले नाहीं, अशी त्याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच तो कपटमार्गाचा अवलंब करतो; तसाच प्रकार