पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१३ )

सखोजी यांस फितूर करून, व मानाजीरावासारखा शूर, पराक्रमी एकनिष्ठ, व जीवावर उदार होऊन शत्रूपुढे सामान्यास दंड ठोकून उभा राहणारा व चिकाटीनें शत्रूचा प्रतिकार करणारा सेनापति अधिकारच्युत करून, दलवाई व घोरपडे या उभयतांनी तंजावर हस्तगत करून घेण्याचा आपला मार्ग सुलभ करून ठेविला.

 इकडे प्रतापसिंहास या संकटांतून कसे मुक्त व्हावें, व आपले संस्थान कसें सुरक्षित ठेवावें, हो मोठीच काळजी उत्पन्न झाली, फ्रेंचांशी वाटाघाट करून त्यांच्याबरोबर आत्मसंरक्षणासाठी तह करण्याची त्यानें खटपट केली. परंतु त्रिचनापल्ली येथे फ्रेंचांचाच पराजय झाल्यामुळे, तो नाद त्यास सोडावा लागला. प्रतापसिंहानें पेशवा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांच्याकडे मदतीची याचना केली. पण पेशव्यांकडून मदत न आल्याने ती आशाही त्यास सोडावी लागली आणि तोंडावर उभ्या असलेल्या शत्रूशी सामना देण्याला आपल्याच्यानेच होईल तितकी सर्व तजवीज करणे त्याला भाग झालें. इतवयात "मुरारराव घोरपडे गुत्तीकराचे बाराशें घोडेस्वार तंजावर प्रांतांत शिरून त्यांनी गांवोगांव मोठाच धुमाकूळ उडविला आहे" अशी बातमी प्रतापसिंहास समजली. तेव्हां त्याला आपला शूर व अधिकार भ्रष्ट केलेला सेनापति मानाजीराव याची आठवण झाली. मानाजीराव हा मोठा पराक्रमी सेनानायक, शूर योद्धा, व अनेक वेळां परशत्रूशी युद्ध करून कीर्ति मिळविलेला रणविद्याविशारद, व अनुभवी सेनानी असून, मुराररावाच्या सैन्याबरोबर सामना देण्याला तोच कायतो एकटा समर्थ आहे, हें प्रताप- सिंहास पूर्णपणे माहीत असल्यानें त्यानें मानाजीराव जगताप यांस पुन्हा -सरखेलपदाचा अधिकार देऊन त्याची मुराररावांच्या सैन्यावर रवानगी केली. त्याप्रमाणे मानाजीराव हा निवडक तीन हजार घोडेस्वार आपणांबरोबर घेऊन, मुराररावावर मोठ्या धडाडीनें चाल करून गेला व त्याच्याशी सामना देऊन त्यांत त्याचा पूर्णपणे पराभव करून त्यानें त्यास तंजावर प्रांतांतून हांकलून लाविले अगाप्रकारे मोठा विजय संपादन करून ( इ० सन १७५४ मानाजी हा परत राजधानीत येऊन प्रतापसिंहास भेटला. पण त्याच्या ह्या उत्कृष्ट व असामान्य कामगिरीचा मोबदला त्याला प्रतापसिंहाकडून योग्य-