पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/97

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यवनांच्या सत्तेला उतरती कळा लागली होती; तेव्हां मराठ्यांच्याप्रमाणे हिंदुस्थानांतील इतर लोकांनी उठाव करून आपल्या प्रांतांत स्वराज्याची स्थापना करून धर्माचें व गोब्राह्मणांचे प्रतिपालन करावयाचे. परंतु हा पराक्रम त्या लोकांच्या हातून झाला नाही. कां की, त्या लोकांच्या अंगों स्वराज्यस्थापनेस एकजूट, पुढारपण वगैरे जे उदात्त गुण लागतात ते नव्हते. शिवाजीच्या प्रोत्साहनाने बुंदेलखंडांत छत्रसालाने काही वेळ यवनांच्याविरुद्ध कंबर बांधिली होती हे खरे आहे. परंतु, मराठ्यांच्याप्रमाणे टिकाव धरून बसण्याइतका चिंवटपणा बुंदेल्यांच्या अंगी नसल्यामुळे स्वराज्याचें बी त्या प्रांतांत जसें रुजावें तसें रुजलें नाही. महाराष्ट्राबाहेरील हिंदुस्थानांतील इतर प्रांतांची ही अशी स्थिति होती. स्वतः त्या लोकांच्या अंगी स्वधर्माचे संरक्षण व स्वराज्याची स्थापना करण्याचे सामर्थ्य नव्हते. तेव्हा ह्या लोकांना यवनांच्या कचाटींतून सोडवून आपल्या अमलाखाली आणावें व हिंदुधमर्माचे व गोब्राह्मणांचे प्रतिपालन करावे असा महाराष्ट्रांतील कर्त्या पुरुषांचा त्यावेळी विचार झाला. १७२० च्या पुढे मराठ्यांनी आपल्या सत्तेचे जाळे जें सर्वत्र हिंदुस्थानभर पसरिलें त्याचे मुख्य कारण हा विचार होय. १६४६ पासून १७९६ पर्यंत कोणताहि महत्त्वाचा तह घेतला असता त्यांत स्वराज्याचे व स्वर्धमाचे कलम नाहीं असें बहुशः व्हावयाचें नाहीं. मराठ्यांची सत्ता सर्व हिंदुस्थानभर पसरण्यास वर सांगितलेला विचार मुख्य कारण झाला. ह्या विचाराने प्रोत्साहित होऊन मराठ्यांनी यवनांच्या हातून १७६० च्या सुमाराला बहुतेक सर्व हिंदुस्थान सोडविले. परंतु सोडविलेल्या प्रांतांत आपली सत्ता कायम करण्यास जे उपाय योजिले पाहिजेत ते १७२० पासून १७६० पर्यंत योजिले गेले नाहीत. खुद्द महाराष्ट्रांत १६४० पासून १७०७ पर्यंत स्वराज्यस्थापनेच्या वेळी जे उपाय योजिले गेले त्यांचा उपयोग महाराष्ट्रतर प्रांतांत १७२० पासून १७६० पर्यंत जे मुत्सद्दी झाले त्यांनी केला नाही. स्वराज्यस्थापनेची कल्पना महाराष्ट्रांतील विचारी पुरुषांच्या मनांत जेव्हां प्रथम आली तेव्हां यवनांच्यासंबंधी द्वेष व स्वधर्मासंबंधी प्रेम महाराष्ट्रातील सामान्य जनांच्या मनांत भरवून देण्याकरितां कथा, पुराणे, यात्रा वगैरे संस्थांच्या द्वारें कित्येक पिढ्या प्रयत्न चालले होते. त्यांच्या योगाने महाराष्ट्रांतील लोकमत जागृत झालें व सर्व लोकांची एकजूट बनविण्याचे बिकट कृत्य साध्य होणे शक्य झाले. पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ १६४६ त रोविल्यावर निराळंच एक संकट उद्भवलें. तें हैं की, महाराजांच्या सेवकसमुदायांत ह्मणजे मुत्सद्दीमंडळांत व सेनानायकांत परस्पर मत्सरभाव उत्पन्न होऊ लागला व स्वामिहित व देशहित साधण्याच्या कामी व्यत्यय येऊ लागले ( समर्थांचा सेवाधर्म, दासबोध ). तेव्हां समर्थासारिख्या थोर विभूति पुढे येऊन त्यांनी ह्या स्वामिद्रोहरूपी व देशद्रोहरूपी रोगांचे उत्पाटन केले ( सेवाधर्म, दासबोध ). आयुष्याची इतिकर्तव्यता काय, स्वामिद्रोह व देशद्रोह केल्यापासून आपलेंच अहित आपण कसें करितों, वगैरे विषयांची चर्चा करून, कुचर सेवकांना ताळ्यावर आणण्यास सुचर