पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सातवा समुल्लास : ईश्वर निवडीची भूमिका स्वामी दयानंद मूर्तिपूजा मानत नव्हते. मूर्तिपूजेचे ते विरोधकच होते. परंतु ते परमेश्वराला मानत होते. समाजाच्या अभ्युदय आणि निःश्रेयसाचा विचार करताना शिक्षण, वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, शासनव्यवस्था या सर्वांबरोबर कोणाची उपासना करायची आणि उपासना कशी करायची याचाही विचार करायला हवा. भारतीय समाजात ३३ कोटी देवांची कल्पना आहे. देवांचा जो देव तो परमेश्वर किंवा परमात्मा हाच उपासनेस योग्य उपास्य देव आहे असे दयानंदांनी ठामपणे सांगितले आहे. तेहतीस कोटी देवांची कल्पना पौराणिक आहे. पुराणे जर वेदांत सांगितलेले सांगत असतील तरच दयानंद त्यांना ग्राह्य मानतात, नाही तर त्याज्य मानतात. कोटी याचा रूढ अर्थ संख्यावाचक आहे. शंभर लक्ष म्हणजे एक कोटी हाच अर्थ सर्व लोक मानतात. कोटीचा दुसरा अर्थ आहे प्रकार. तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस प्रकारचे देव वेदांत सांगितले आहेत. वेदांतले हे ३३ देव दयानंदांना मान्य आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य आणि नक्षत्र ही आठ सृष्टीची वसतीस्थाने असल्याने हे आठ वसू आहेत. पाच प्राण, पाच उपप्राण आणि अकरावा जीवात्मा हे शरीर सोडून जाताना रडवतात किंवा रुदन करायला लावतात म्हणून ते अकरा रुद्र आहेत. आणि वर्षाचे बारा महिने हे सर्वांचे आयुष्य क्रमाक्रमाने घेऊन जातात म्हणून ते बारा आदित्य आहेत. आठ वसू, अकरा रुद्र व बारा आदित्य हे ३१ देव झाले. ३२वा इंद्र म्हणजे वीज हे ऊर्जेचे एक रूप आणि ३३वा प्रजापती म्हणजे ज्यांच्यामुळे प्रजेचे पालन होते असे सगळ्या प्रकारचे यज्ञ. या तेहतीसांमध्ये विशेष गुण असल्यामुळे हे देव आहेत आणि ३४ वा या देवांचा देव महादेव असलेला परमेश्वर आहे. मूर्तिपूजा का करायची नाही ? तर ज्या डोंगरातून मूर्ती घडवतो तो डोंगर व पृथ्वी याच परमेश्वराने बनवलेल्या महामूर्ती कायम समोर असतात. त्यांना पाहिल्यानंतर परमेश्वराचे स्मरण होत नसेल तर मूर्ती पाहिल्यानंतरही होणार नाही असे दयानंद म्हणतात. वेदप्रामाण्य व तर्कदृष्ट्या पाहिले तर दयानंदांचा हा युक्तिवाद योग्य व उत्तम आहे. इतिहासात 'सुंदर २४ महर्षी दयानंद काय म्हणाले ?