पाणी किती लागणार हें त्या परवानगी अर्जात आगाऊ कळवावें लागतें. येथून पाणी नेण्याबद्दलची भिस्ती लोकांची मजूरी मालकांस तलावापासून बंगल्यांच्या लांबीच्या मजलीप्रमाणें कमज्यास्त पडते. साहेब लोक व पारशी लोक हें पाणी कातडयाच्या पखालींतून भिस्तीलोकांकडून नेतात. परंतु बंगल्यांत राहणारे हिंदु लोक किंतानाच्या कापडाच्या पखाली करून त्यांतून पाणी आपल्या जातीच्या माणसांकडून आपल्या बंगल्यावर नेवावितात. पाण्यासंबंधानें इतका बंदोबस्त करण्याचें कारण इतकेंच आहे कीं, उन्हाळ्यामध्यें येथील सर्व विहिरींना व तलावांना पाणी बरेंच कमी असतें; तेव्हां पाण्याचा अद्वातद्वा खर्च केल्यानें सर्व लोकांस पाणी पुरावयाचें नाहीं, तोटा येईल हें मनांत आणून ही तजवीज केली आहे. रुचकरपणांत व गुणकारीपणांत येथील सर्व ठिकाणचें पाणी सारखेच आहे.
याशिवाय दुसरे पुष्कळ झरे व विहिरी येथें आहेत, परंतु त्यांवर म्युनिसिपालिटीचा कांहीं प्रतिबंध नाही. त्यांची माहिती पुढें दिली आहे.