हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७६ )



समयास डोंगरांतून ठिकठिकाणी झरे वाहत असतात, ते इतके कीं बहुतकरून उंबराचा वृक्ष दृष्टीस पडला ह्मणजे मुळाशी झुळझुळ वाहणारा लहानसा तरी झरा हटकून सांपडतो. तथापि उन्हाळ्यामध्यें पाणी विपुल असावें तसें नसतें. कित्येक ठिकाणी दूर अंतरावरून, व दरडी चढून पाणी आणावें लागतें. कृष्णा आदि करून नद्यांचे उगम महाबळेश्वरी आहेत, तथापि वाहतें पाणी मुबलकपणें सांपडत नाहीं, असें ह्मटलें तरी चालेल, वेण्या तलावांतून एक लहानसा प्रवाह निघून वेण्येचे खोऱ्यांत पडतों हें खरें, परंतु तिकड़े जाण्याचा फार लांबीचा पल्ला असल्यामुळे तो केवळ परीट लोकांस उपयोगी पडणेसारखा आहे. येथें बहुतेक ठिकाणी विहिरींचें पाणी काढून गुजारा करावा लागतो, व त्या फार खोल असल्यामुळे त्यांतून पाणी शेंदून काढण्याची फार मेहनत पडते.


---------------