हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १११ )

 कृति कशी आहे याबद्दलची थोडी माहिती पुढें देतो. ती शहरवासी लोकांस मौजेची वाटेल.

 नाचणी, वरी, यांचें पीक करण्यास प्रथमत: त्यांचीं रोपें ज्यांच्या त्यांच्या लागवडीच्या जागेत करावीं लागतात. प्रथम रानांतील राब ( जंगलांतील झाडें, झुंडपें, पाला) आणून रोप करण्याच्या जागीं पसरून ठेवितात. पुढें मार्च किंवा एप्रिल महिन्यांत ती राब चांगली वाळली ह्मणजे तिला आग लावून खालील जमीन भाजतात. या तयार केलेल्या जमिनीस तरवा ह्मणतात. या भाजलेल्या जमीनीवर पाऊस प्रथम पडला ह्मणजे त्यांत हीं धान्यें जून महिन्यांत पेरतात. महिना पंधरा दिवसांत या धान्यांचीं रोपें होऊन त्यांची गांठ बसण्यासारखीं तीं मोठी झालीं ह्मणजे माणसांकडून उपटून काढून स्वच्छ धुतात व लागणीकरितां राखून ठेविलेल्या ठिकाणी त्यांचा ढीग घालून ठेवितात. वर जमीन भाजावी लागते ह्मणून सांगितले आहे ती अशाकरितां कीं, त्यांतील तयार झालेलें रोप काढून लागणीचें ठिकाणीं नेण्याचे वेळीं तें तुटूं नये.