हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११३ )


घेतात. एका खंडीचें पिकास राब गोळा करण्यास, खत टाकण्यास, रोप करण्यास, रोप लावण्यास, बेणण्यास, व झोडण्यास वगैरे सर्व कामांस प्रत्येकी सरासरी वीस माणसांप्रमाणें १२० माणसांना कष्ट करावे लागतात.

 नाचणी, वरी- हीं धान्यें पिकविण्यास वरीलप्रमाणेंच तरवा करून रोपें तयार करतात; आणि डोंगराच्या घसरणीवरील जमीन नांगरून व पुनः पर्जन्य पडल्यानतर नांगराने तिची लागण न होणेसारखा भाग काढून दोहारणी करतात ह्मणजे दोन वेळ ती नांगरतात आणि मग तींत वर सांगितले रीतीप्रमाणें रोप खोंवीत जातात. पुढें हीं रोपें मोठी होऊन पोटरीत (कोंबांतील कणीस बाहेर) पडण्याचे वेळेला त्या जमीनांतील गवत भांगलून काढितात; यामुळे पीक जलद पदरांत पडतें. पुढें बैल लावून खळ्यावर (रानांत सारवून केलेल्या जाग्यावर) ह्यांची मळणी करतात. हेंच नाचणीचें पीक सपाटीवर केल्यास , त्यांत पावट्याची मोगण करतात; ह्मणजे मधून मधून विरळ पेरितात.