चांभार- हे लोक उत्तम प्रकारचे बूट, स्लिपर व चढाव बांधितात. याशिवाय इतर घाटाचे जोडे करणारे चांभार येथें फार कमी असतात.
बुरूड- बुरूड लोक वेताचे करंडे, खुर्च्या, वगैरेचीं विणकर कामें करितात. शिवाय बांबूचे तट्टे, पारसले पाठविण्याचे करंडे, आणि दुसरे सुपें वगैरे हर तऱ्हेचे जिन्नस करितात.
खाटीक- भाजी मंडईचेनजिक मटन मारकेट आहे तेथें बकऱ्याचें व मेंढ्याचें मांस, कोंबडीं व कोंबडयाचीं अंडीं मिळतात. याच पलीकडे बीफ ( गोमांस ) विकण्याचा बाजार आहे. या व्यापाराला सरकारांनीं मर्यादित केल्यास डोंगरमाथ्यावर पुढे गुरांचा तोटा पडण्याची भीति राहणार नाही,
याशिवाय गाडय़ा नीट करणारे घिसाडी, टिनच डबे, कंदील करणारे टिनमन व फर्निचर भाडयानें देणारे हौउस एजंटही येथें आहेत. दवाखान्याजवळ ट्रेचर कंपनीचें औषधाचें व दुसरे साहेब लोकांचे खान्याच्या सामानाचें दुकान आहे.