हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३ )



ओरी आहे तींतून भागीरथी नदी बारा वर्षांनीं कन्या राशीस गुरू आला म्हणजे कन्यागतीं वाहूं लागते, अशी आख्यायिका आहे. त्या वेळेस येथें वर्षभर यात्रेकऱ्यांच्या उड्यावर उड्या पडतात. आणि हिंदुधर्माप्रमाणें काशीस भागीरथीतटाकीं जे विधी, मुंडण वगैरे करणें इष्ट आहे ते येथें येऊन करितात. उजवे बाजूचे ओरींतून साठ वर्षांनीं कपिलाषष्ठीचा योग आला म्हणजे सरस्वती नदी वाहूं लागते, तेव्हांही मोठी गर्दी होते. असें पुराणांतून या नद्यांचें माहात्म्य वर्णन केलें आहे. परंतु पावसाळ्यामध्यें या सर्व ओऱ्यातून पाणी मोठ्या जोराने वाहतें, आणि कुंडे अगदीं तुडुंब भरून जातात आणि वाहूं लागतात. अशा वेळीं यांचें सांडपाणी जाण्यास मार्ग खालून केला असल्यामुळे त्यांतून जातें.

 या पांची नद्या महाबळेश्वर डोंगराखालीं निरनिराळ्या द-यांतून वाहत गेल्या आहेत. कृष्णा नदी वर सांगितलेल्या देवळापासून सुमारें ५०० यार्ड अंतरावर कडयावरून खालीं जोर खो-यांत पडून पूर्ववाहिनी झाली आहे. ती जोर, धोम, वांई वगैरे गांवांशेजारून वाहत जात आहे.