हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५५ )



थंडी इतकी पडते कीं, आंग उघडें ठेविल्यास त्यास तें फुटून भेगा पडतात; व झाडावर थंडीचे कडके पडून झाडें कोंवळींं असल्यास वाळून जातात. कधीं कधीं घरांत सांठविलेल्या पाण्याचें गोंठून बर्फ बनतें. पूर्वेकडून थंडगार वारा सकाळी व सायंकाळीं सुटतो तो तर अंगाला फार झोंबतो. या वेळी उष्णता मापक यंत्रांतील पारा ६०|७० अंशावर येतो. फेब्रुवारी महिन्यापासून थंडी कमी कमी होत जाऊन शेवटीं अर्धामुर्धा फेब्रुवारी महिना होतो आहे इतक्यांत हिंवाळा खलास होऊन उन्हाळा डोकाऊं लागतो. परंतु येथील ऐन उन्हाळा तारीख १२ मार्चपासून सुरू होऊन एप्रिल महिना आखेरपर्यंत सरासरी असतो. एप्रिल महिन्याच्या अखेरीच्या सुमारासच पूर्वेकडील वारा वाहण्याचें बंद होऊन पश्चिमेकडून वारा वाहूं लागतो. हा पश्चिमेकडील वारा सुरू झाला ह्मणजे पाऊसकाळाचे डोहाळे लागण्यास प्रारंभ होतो. मे महिन्यामध्यें पश्चिमेकडून समुद्र किना-यावरील वाऱ्याच्या झुळका येऊंं लागल्या म्हणजे ऊष्ण प्रदेशांतून येथें येणा-या लोकांस फार समाधान वाटल्याशिवाय राहत नाहींं.