पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोहोचवण्याच्या हेतूने सयाजीराव महाराजांनी १९०६ मध्ये बडोद्यात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. हा आधुनिक भारताच्या शैक्षणिक इतिहासातील क्रांतिकारक निर्णय होता. आजही मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा हा निर्णय विकसनशील भारतामध्ये शिक्षणाचे खासगीकरण करून समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणापासून वंचित ठेवू पाहणाऱ्या सरकारसाठी अनुकरणीय आहे. परंतु लोकसंख्येने सर्वांत मोठा असलेल्या मराठा जातीची दयनीय शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी सयाजीराव महाराजांनी त्यांचे विश्वासू अधिकारी खासेराव जाधवांच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये शैक्षणिक प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी महाराजांनी बडोद्यात खासेरावांच्या अध्यक्षतेखाली 'मराठा फंड' स्थापन केला.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची पूर्वपीठिका

 १८८० च्या दशकात महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली जुन्नरचे डुंबरे - पाटील आणि अन्य सहकाऱ्यांनी बहुजनांमध्ये शैक्षणिक प्रसारासाठी प्रयत्न सुरू केले. पुढे सयाजीराव महाराजांनी गंगारामभाऊ म्हस्केंच्या माध्यमातून मराठा जातीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले. याचदरम्यान मुंबईत नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांच्या 'दीनबंधू' वर्तमानपत्राच्या माध्यमातून मराठा जातीच्या जागृतीसाठी प्रयत्न चालवले होते. वासुदेव लिंगोजी बिर्जे यांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेवर लिहिलेले अनेक अग्रलेख दीनबंधूमध्ये प्रकाशित

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १०