पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या बैठकीचे वर्णन करताना 'ज्ञानप्रकाश' कार लिहितात, "महाराष्ट्रातील चारही ठिकाणचे सरदार, दरकदार, मानकरी व थोर थोर मराठे गृहस्थ आपापल्या मराठेशाही दरबारी पोशाखानिशी आलेले होते. त्यामुळे सभेची काही अपूर्व शोभा दिसत होती. त्या शोभेची कल्पना संस्थानी प्रजेला अगर ज्याने मराठीशाही दरबारी थाट अवलोकन केला असेल त्यालाच होईल. आज मराठ्यांचे पूर्ववैभव नष्ट झाले आहे, त्यांचे तेज आज इतिहासगत होऊन गेले आहे, त्यांचे शौर्य, औदार्य आणि स्वामी कार्य आज कालगतीने विपरीत परिस्थितीला पोहोचले आहे; तथापि त्यांच्या सद्गुणांचा लोप झालेला नाही. त्यांचा धीरोदात्त स्वभाव विलुप्त झालेला नाही. ते गुणधी, सालस, प्रेमळ, उदात्त, सरळ वृत्तीचे व स्नेहशील मराठे बंधू एकत्र जमलेले पाहून कोणाला आनंद होणार नाही."

 या बैठकीचे अध्यक्ष देवास संस्थानचे तुकोजीराव पवार महाराज प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून गैरहजर राहिल्यामुळे ऐनवेळी त्यांच्या गैरहजेरीत खासेराव जाधवांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळाला. सभेची सुरुवात परिषदेचे चिटणीस भास्करराव जाधव यांनी अहवाल वाचनाने केली. यामध्ये मागील वर्षभरात केलेल्या कार्याचा वृत्तांत आणि संपूर्ण भारतातील प्रमुख बाराशे मराठा जातीतील व्यक्तींची यादी वाचून दाखवतानाच संपूर्ण कार्याचा अहवाल छापून

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १७