पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसिद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले. अहवाल वाचनानंतर स्वागत कमिटीचे अध्यक्ष मानाजीराव कुवरजी राजेशिर्के यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून आपल्या भाषणास सुरुवात केली.

 याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “विद्याप्रसाराच्या कामी श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांचे प्रयत्न अभिनंदनीय आहेत. तसेच श्रीमंत महाराज अलिजाबहार माधवराव शिंदे आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी शिक्षणाच्या बाबतीत पुष्कळ प्रयत्न चालवले आहेत. परंतु हे प्रयत्न आपल्या सारख्या प्रचंड समुदायास विद्यासंपन्न करण्यास पूर्णपणे समर्थ नाहीत. याकामी आपल्या एकंदर समाजाकडून एकजुटीने कार्य होईल तरच म्हणण्यासारखा परिणाम दृष्टीस पडेल. या कामी आपण सर्वांच्या ऐक्याने आपले प्रयत्न सुरू करण्याच्या हेतूने मराठा शिक्षण परिषदेची स्थापना केली आहे. परिषदेचा मुख्य हेतू विद्या प्रसार करणे हाच एक असला पाहिजे व मुख्यतः ज्ञान प्रसाराच्या मार्गाने आपली उन्नती करून घेतली पाहिजे. ज्ञान ही मोठी जबर शक्ती आहे व आपला समाज उन्नत आणि सामर्थ्यवान होण्याला तिचीच आराधना केली पाहिजे. सामाजिक धार्मिक व नैतिक वगैरे हरेक बाबतीत उन्नती करून घेण्याला विद्या हे साधन आहे. म्हणून आपल्या समाजातील भावी तरुण पिढी ज्ञानसंपन्न होईल असे मार्ग योजण्याचे तयारीस आपण लवकर लागले पाहिजे.”

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १८