पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अध्यक्षीय भाषणामध्ये खासेराव जाधवांनी एकमेकासंबंधीचा अविश्वास व गैरसमज दूर करण्यासाठी एके ठिकाणी जमून विचारांची देवाण - घेवाण गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. यामुळे अज्ञान दूर होऊन साधक-बाधक चर्चा होते. परिणामी समाजाच्या उन्नतीस गती लाभते. म्हणून अशा प्रकारच्या परिषदा सातत्याने भरवल्या गेल्या पाहिजेत असे मत खासेरावांनी व्यक्त केले. या भाषणात खासेराव म्हणतात, “आपण मराठे म्हणजे क्षत्रिय असून आपले वीर्य जिव्हेत नाही. बाहुत आहे. म्हणून अमुक सुधारणा करावी, तमुक करावी, असे कागदी ठराव करण्याची आपणास जरुरी नाही.

 आपणास ज्या गोष्टी योग्य वाटतील त्या कृतीतच आल्या म्हणजे झाले. आंतरिक कळकळ पाहिजे म्हणजे सर्व होते. ती नसेल तर परिषदेतील मोठी मोठी भाषणे म्हणजे 'मोले घातले रडाया । नाही आसूं आणि माया' या उक्तीप्रमाणे हास्यास्पद होत.” या अध्यक्षीय भाषणानंतर कै. वासुदेव बिर्जे यांच्या पत्नी तान्हुबाई बिर्जे यांनी 'दीनबंधू' वर्तमानपत्र चालू ठेवण्यासाठी मदत मिळण्यासंदर्भात विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार खासेरावांच्या १०० रु.सह सर्वांनी एकूण ४५० रु. रक्कम गोळा करून दिली.

तिसरे अधिवेशन - १९०९

 दुसऱ्या अधिवेशनाच्या समाप्तीप्रसंगी पुढील अधिवेशन वऱ्हाडात घेण्याची विनंती विदर्भातील मराठा नेत्यांनी केली.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १९