पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या विनंतीनुसार मराठा परिषदेचे तिसरे अधिवेशन २८ डिसेंबर १९०९ रोजी अमरावती येथे भरवण्यात आले. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी सयाजीरावांचे बंधू संपतराव गायकवाड तर स्वागताध्यक्ष म्हणून माधवराव शंकरराव देशमुख यांची निवड करण्यात आली. या परिषदेस खासेराव जाधवांसह भारतातील विविध प्रांतातून मान्यवर मंडळी व श्रोते उपस्थित होते.

 या परिषदेच्या स्वागतपर भाषणात प्रत्येक जातीतील शिक्षण प्रसाराचे महत्त्व विशद करताना माधवराव देशमुख म्हणतात, “प्रत्येक गोष्ट करण्यास ज्ञान पाहिजे. ज्ञान विद्येने प्राप्त होते व विद्येची द्वारे सरकारने सरसकट सर्व ज्ञातीस मोकळी केली आहेत. त्याचा फायदा प्रत्येक ज्ञात घेत आहे. आज मुसलमान, शिंपी, माळी, प्रभू, सारस्वत, देवरुखे, जैन, लिंगायत ह्या जाती सभा करून शिक्षण प्रसारक मंडळे स्थापन करून आपापल्या ज्ञातीस शहाणे करत आहेत. आपल्या समाजास हे फार नेटाने केले पाहिजे. आपण नेहमी समाजास मार्गदर्शक व संरक्षक आहोत अशी आपली ख्याती आहे. तेव्हा समाजाचे कल्याण व्हावे आणि आपला पहिला मोठेपणा कायम राहावा म्हणून आपणास विद्येत फारच झपाट्याने मजल मारली पाहिजे.”

 माधवराव देशमुखांनंतर झालेल्या अध्यक्षीय भाषणात संपतराव गायकवाड यांनी आपल्या पूर्वजांच्या इतिहासाला शोभेल असे कार्य करण्यासाठी सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन या परिषदेच्या ध्येय-धोरणाच्या पूर्तीसाठी झटण्याचे आवाहन केले.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २०