पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या भाषणात संपतराव म्हणतात, “बहुजन समाजाची स्थिती सुधारण्याचा उत्तम आणि खात्रीचा उपाय म्हणजे शिक्षण होय. सर्व सुधारणेचे मूळ शिक्षण आहे. शिक्षणाच्या अभावामुळेच समाजाची अवनती झाली. ज्ञान ही एक प्रचंड शक्ती आहे. या शक्तीपुढे सर्व शक्ती तुच्छ आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांनी ज्ञानाच्या जोरावर उन्नती साधली आहे.” परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना खासेराव जाधवांनी "तेरा बलुत्यांच्या जोडीला आमच्या शेतकरीवर्गाने 'विद्यादान' हे चौदावे बलुते अंगावर घ्यावे" असे म्हणत मराठा शिक्षण फंडा मदत करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार अर्ध्या तासात १०,००० रु. हून अधिक देणगी जमा झाली. त्यात संपतराव गायकवाड (५०० रु.), तुकाराम पाटील (६२५ रु.), बापूराव जानराव (५०० रु.), सोनाजी टिक्के (५०० रु.) व यशोदाबाई जोशी (२०१ रु.) यांच्या देणग्यांचा समावेश होता.

 विशेष बाब म्हणजे या अधिवेशनाला सयाजीराव महाराज स्वतः उपस्थित होते. यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना प्रगत कृषी साधने देण्याची गरज सयाजीरावांनी विशद केली. याचवेळी शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना शेती, उद्योग आणि इतर विषयांच्या उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची आवश्यकता सयाजीरावांनी व्यक्त केली. 'संसारकार्याइतकेच समाजकार्याला महत्त्व देणारा स्वार्थत्यागी व खऱ्या कळकळीची व्यक्तीच समाजसुधारणेचे कार्य उत्तम पद्धतीने

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २१