पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतात, “मराठा समाजामध्ये अगोदर शिक्षण प्रसार झाला पाहिजे. शिक्षणाने त्यांना खरे-खोटे समजण्याची पात्रता येईल. समाज शिकला नाही तर धार्मिक बाबतीत बंड करण्याची ताकद त्यांच्यात येणार नाही. मराठा समाजाची मुले अगोदर शिकली पाहिजेत. त्या मुलांनी इंग्रजीही शिकून घेतले पाहिजे. हा खर्च मुलांना झेपणारा नाही म्हणून समाजातील ऐपत असलेल्या मंडळींनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे.” दरम्यान सयाजीराव महाराज पुण्यात आले असता गंगारामभाऊंनी महाराजांना भेटून संस्था स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट केला.

 सयाजीराव महाराजांनी मराठा जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज ओळखून 'डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन'ला स्थापनेपासूनच २४०० रु. वर्षासन सुरू केले. या वर्षासनाच्या माध्यमातून १८८५ ते १९३९ अशी ५४ वर्षे सयाजीरावांनी केलेली एकूण मदत ५ लाख २९ हजार ५५६ रु. इतकी आहे. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ७२ कोटी ४५ लाख रु. हून अधिक भरते. सयाजीरावांप्रमाणेच शाहू महाराजांनीही सत्ताधिकार प्राप्तीनंतर १८९४ पासून या संस्थेला ५५० रु. वर्षासन चालू केले. यासंदर्भात २३ जानेवारी १८८६ ला खासेराव जाधवांना लंडनला लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, “आपल्या समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पुण्यात स्थापन झालेल्या एका मराठा संस्थेला आम्ही दरमहा दोनशे रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. आमचा हेतू पूर्ण होण्याच्या दृष्टीने ते अनुदान उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.”

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ८