पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मार्गक्रमण करत स्त्री-उन्नतीसाठी कार्यरत राहिलेल्या महाराणी चिमणाबाईंना ३ ऑगस्ट १८९२ ला ब्रिटिश महाराणींनी 'Emperial Order of the Crown of India' या किताबाने सन्मानित केले. १९०६ मध्ये कलकत्ता येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या दुसऱ्या हिंदी औद्योगिक परिषदेतील महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून चिमणाबाईंची निवड करण्यात आली होती. याच अधिवेशनाच्या सर्वसाधारण विभागाचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. राजा आणि राणी पती-पत्नींना एकाच वेळी एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद सन्मानाने मिळण्याचा भारतातील हा एकमेव प्रसंग असावा. महाराणी चिमणाबाई या पडदा पद्धतीचा त्याग करणाऱ्या भारतातील 'बहुधा पहिल्या राणी आहेत.
 १९१९ मध्ये महाराणी चिमणाबाईंनी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची जगातील ७ खंडातील २९ देशांमधील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करणारा 'The Position of Women in Indian Life' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. अशा पद्धतीने लिहिलेला जगातील हा आजअखेरचा एकमेव ग्रंथ आहे. चिमणाबाईंनी हा ग्रंथ भारतीय स्त्रियांना अर्पण केला असून तो लंडनमधून प्रकाशित झाला होता. हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या प्रेरणेने विकसित झालेल्या चिमणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा परमोच्च बिंदू होता.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ११