पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रियांचा उत्कर्ष : बडोद्यातील उपक्रम
 स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सयाजीरावांनी महाराणी चिमणाबाईंच्या नेतृत्वाखाली बडोद्यात विविध संस्था सुरू केल्या. स्त्रियांचा सामाजिक संपर्क वाढावा यासाठी ३ मार्च १९०३ रोजी 'चिमणाबाई लेडीज क्लब'ची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारचा भारतातील हा पहिला क्लब होता. या क्लबच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील बुद्धिमान स्त्रियांमध्ये होणारा परस्पर संवाद हा बडोद्यातील स्त्रीशिक्षणाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रियांचा दृष्टिकोन व्यापक व्हावा, त्यांचा सामाजिक अवकाश विस्तारून त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी या उद्देशाने २० फेब्रुवारी १९९५ ला 'श्री महाराणी चिमणाबाई स्त्री समाजा'ची स्थापना करण्यात आली. श्री. मनोरमा दिघे यांच्या नेतृत्वाखाली १९१५ साली जुम्मादादा व्यायाम मंदिरात 'कन्या आरोग्य मंदिरा'ची स्थापना करण्यात आली. महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू करणारे भारतातील पहिले बडोदा संस्थान सयाजीरावांच्या आधुनिक विचारांची साक्ष देते.
 स्त्रियांना स्वावलंबी व त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी १९१७ मध्ये 'स्त्री उद्योगालया' ची स्थापना करण्यात आली. या उद्योगालयाने महिलांविषयीचे विविध उद्योग आणि तांत्रिक शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाची सोय करून दिली. आई व बालकाचे आरोग्य उत्तम असणे राष्ट्राच्या

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १२