पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकासातील अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याने सयाजीरावांनी माता व बालकांच्या आरोग्यासाठी जे जे करता येईल ते सर्व केले. भारतातील पहिल्या 'बाल सप्ताह' आयोजनाचे श्रेय बडोदा संस्थानला जाते. १ ते ६ फेब्रुवारी १९२४ दरम्यान बडोद्यात आयोजित केलेल्या बाल सप्ताहामध्ये मातेचे आरोग्य व बालकांचे संगोपन या विषयाशी संबंधित निबंध स्पर्धा तसेच 'महिला आणि बालकल्याण' या विषयावरील पोस्टर प्रदर्शन भरविले होते.
 आर्थिक सबलीकरणाबरोबर महिलांना काटकसरीची सवय लागून महिलांची उन्नती व्हावी यासाठी सयाजीरावांनी १९३१ मध्ये महिलांच्या काटकसर संस्थांची (म्हणजेच बचत गटांची) स्थापना केली. भारतातील बचत गट चळवळीचा हा आरंभ बिंदू होता. बांग्लादेशातील अर्थशास्त्रज्ञ आणि बचत गट चळवळीच्या कामाची दखल घेऊन २००६ मध्ये ज्यांना नोबेल पुरस्कार दिला गेला त्या महंमद युनूस यांनी त्यांच्या कामास सुरुवात करण्याअगोदर ५० वर्षे सयाजीरावांनी बडोद्यात हा प्रयोग यशस्वी केला होता.
 महिलांनी आपल्या बंदिस्त जीवनक्रमातून थोडासा वेळ काढून करमणूक, व्यायाम आणि खेळ यात आपला वेळ घालवावा यासाठी १४ फेब्रुवारी १९३७ रोजी 'महिला क्रीडा मंडळ' सुरू करण्यात आले. या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्त्रियांना योगा, लाठी, लेझीम यासारख्या मैदानी खेळांचे प्रशिक्षण दिले जात असे.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १३