पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१ दशालाड व १ मोटवानी अशा चार विधवांनी पुनर्विवाहाची परवानगी मागितली होती. त्याचप्रमाणे डभईजवळच्या दशालाड वाणी जातीतील विधवांनीसुद्धा गायकवाड सरकारकडे अशाच प्रकारे अर्ज केला होता.” दुर्दैवाने या कायद्याचा फारसा लाभ घेण्यात आला नसला तरी महाराजांनी विधवा पुनर्विवाहाला शक्य तितका पाठिबा दिला होता.
 महाराजांचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणेतील पुढाकार जगजाहीर आहे. धर्म असो किंवा जात महाराज या सुधारणांकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहात असत. या संदर्भात रियासतकार सरदेसाईंनी 'श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत ' या त्यांच्या ग्रंथात नोंदवलेली आठवण महत्त्वपूर्ण आहे. या आठवणीतून एक बाब स्पष्ट होते की, महाराज फक्त कायदे करून थांबत नसत तर त्या अनुषंगाने आवश्यक कृतीची सुरुवात स्वतः पासून करत असत.
 सरदेसाई लिहितात, “लोकहिताच्या बाबत दिसली की महाराज तिचा मोठ्या उत्कंठेने पुरस्कार करीत. सामाजिक बाबतीत तर अग्रगण्यच बनले. १९०८ साली गणेश सदाशिव भाटे नावाच्या एका विद्वान् तरुणास महाराजांनी नोकरीत घेतले. त्याची हुशारी व चलाखी विशेष कौतुकास्पद होती. नुकतेच ते इंग्लंडचा अभ्यासक्रम पुरा करून परत आले. तत्पूर्वी त्यांची पहिली तरुण बायको वारली आणि द्वितीय विवाहासाठी वीस वर्षाची एक विधवा बाई त्यांनी पसंत केली. भाट्यांचे वडील - मातुश्री

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १५