पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हयात होते. त्यांस हा पुत्राचा विचार पसंत नव्हता. विधवा बाईशी मुलाने पुनर्विवाह केला तर आपण त्याचे तोंड पाहाणार नाही, लग्न मोडून काढू; असा धाक त्यांनी मुलास घातला. भाटे कुटुंबाचा व माझा चांगला परिचय असून ही पुनर्विवाहाची अडचण सहजी बोलताना मी महाराजांच्या कानावर घातली. पुनर्विवाह लावण्यास पुरोहित कोणी पुढे होईनात.
 बडोद्याच्या सनातनी मंडळींनी लग्नात विघ्न आणण्याचा चंग बांधला. महाराजांनी निश्चय केला कीं, सुधारणेची ही संधी सहज आली आहे तिचा उपयोग करून आपण त्यात यश मिळवावे. त्यांनी पदरच्या आश्रितांस कळविले, आपल्या राज्यांत विधवा- पुनर्विवाह रूढ करण्याची आवश्यकता आहे. महाराजांचा पाठिंबा मिळाल्यावर मग विरोधकांची डाळ काय शिजणार ! सरकारांतून सर्व साहित्य व मदत मिळाली. चिमणबागच्या वाड्याला लागून एक भला मोठा विस्तीर्ण मंडप सिध्द झाला. सरकारांतून तीन-चारशे मंडळींना आमंत्रणे गेली. मुंबई- पुण्याकडचे अनेक नामांकित पाहुणे बोलावण्यात आले. माघ मासात सकाळी आठपासून दहापावेतो एकंदर विवाहसमारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. महाराज स्वत: हजर राहिले. जिकडे तिकडे आनंदीआनंद पसरला. मुंबईचे बॅरिस्टर मुकुंदराव जयकर समारंभास हजर होते. त्यांचे सुंदर भाषण त्या वेळी लोकांना ऐकण्यास मिळाले. स्वतः महाराजही बोलले. नवरदेव भाटेही बोलले.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १६