पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दोन प्रहरी तीनशें पात्रांचे सुंदर पंक्तिभोजन 'लक्ष्मी-विलास' राजवाड्यात झाले. त्यास भाट्यांचे वडील हजर राहीनात. त्यांचा या उपक्रमास तीव्र विरोध होता. भोजनास हजर राहणार नाही, असा जबाब त्यांनी पाठविला. त्यावरून महाराजांनी मला त्यांच्याकडे पाठवून कळविल, 'भोजन तुम्हास 'नको असेल तर करू नका, पण भोजनप्रसंगी महाराजांजवळ बसून गोष्टी बोलण्यास काय हरकत!” मग ते पंक्तींत आले. महाराजांच्या बाजूस त्यांचा पाट मांडला. समोर मिठाईचे ताट ठेवले. त्यांनी पंक्तीत हिंडून आग्रह व विचारपूस केली. हा एकंदर प्रसंग इतका यशस्वी झाला की, विधवा-पुनर्विवाहाची पध्दत सहजी राज्यात दृढमूल झाली. " हा प्रसंग सयाजीरावांची कृतिशीलता अधोरेखित करतो.

 १८८४ मध्ये महात्मा फुलेंनी मुंबई सरकारकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा करून बालविवाह लावणाऱ्या दोन्ही पक्षातील पालकांकडून दंड वसूल करावा व तो दंड बहुजनांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची मागणी केली होती. विशेष बाब म्हणजे ही मागणी करत असतानाच अशा प्रकारचा कायदा करण्याची दृष्टी संपूर्ण भारतात फक्त सयाजीरावांकडे असल्याचे मत फुलेंनी नोंदवले होते. महात्मा फुलेंची ही अपेक्षा सत्यात उतरवत सयाजीरावांनी १९०४ मध्ये त्यांच्या मागणीला सुसंगत असा 'बालविवाह प्रतिबंधक कायदा' बडोद्यात लागू केला.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १७