पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९०८ मध्ये आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देणारा विशेष विवाह कायदा सयाजीराव महाराजांनी बडोद्यात लागू केला. ब्रिटिश भारतात कोठेही असा कायदा अस्तित्वात नव्हता. अशा प्रकारचा कायदा करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होते. स्वातंत्र्यानंतर १९५४ मध्ये भारतात असा कायदा संमत करण्यात आला. त्याआधी ४६ वर्षापासून बडोद्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली होती.
 ब्रिटिश भारतातील विवाह नोंदणी कायद्यानुसार आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांना आपण कोणत्याही मान्यताप्राप्त धर्माचे अनुयायी नाही असे घोषित करावे लागत होते. परंतु बडोदा कायद्यात अशी घोषणा आवश्यक नव्हती. आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार धर्माचरणाचे स्वातंत्र्य बडोद्याच्या या कायद्यात देण्यात आले होते. १९०८ ला हा कायदा करून सयाजीरावांनी लोकांना एक महत्त्वाचे स्वातंत्र्य बहाल केले. तसेच हा कायदा पास झाल्यानंतर ३२ वर्षात फक्त ५० विवाह या कायद्यानुसार झाले. यामध्ये हिंदू आंतरजातीय विवाहाची ४७ प्रकरणे आहेत तर दोन हिंदू-पारसी व हिंदू- ख्रिश्चन व एक बौद्ध-ख्रिश्चन विवाह या कायद्याअंतर्गत झाले आहेत. यामध्ये जैन आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये असा एकही विवाह झाला नाही.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १९