पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मागण्याचा अधिकार देण्यात आला. या मुख्य कलमांबरोबरच पत्नीच्या व तिच्या मुलाच्या उदरनिर्वाह आणि संगोपनाची व्यवस्था करण्याबद्दलचे नियमही या कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते. पुढच्याच वर्षी १९३२ मध्ये महाराजांनी 'माता कल्याण कायदा' बडोद्यात अमलात आणला. १९२९ च्या 'बॉम्बे माता कल्याण कायद्या'च्या धर्तीवर हा कायदा करण्यात आला होता. कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या प्रसूतीच्या काही काळ आधी व काही काळ नंतर कारखान्यातील त्यांच्या रोजगाराच्या नियमनाची आणि प्रसूतीदरम्यान त्यांना आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली.
 १९३३ मध्ये सयाजीराव महाराजांनी बडोद्यात 'हिंदू स्त्रियांचा संपत्तीतील हक्क कायदा' लागू केला. वारसा हक्काने हिंदू महिलांना संपत्तीत हिस्सा देणारा हा कायदा लागू करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होते. मृत मुलींच्या मुलांना जिवंत मुलींबरोबर संपत्तीत वाटा देण्याची सयाजीरावांनी या कायद्यात केलेली तरतूद स्वतंत्र भारतात ७० वर्षांनंतरदेखील लागू होऊ शकली नाही यातून सयाजीरावांच्या या कायद्याचे क्रांतिकारकत्व सिद्ध होते.
 स्त्री सक्षमीकरणासाठीच्या प्रयत्नांबरोबरच महाराजांनी सरकारी नोकरीत स्त्रियांना रुजू करून घेण्याचा हुकूम काढला. सयाजीरावांचा हा हुकूम म्हणजे संधी आणि शिस्त यांच्या मिलाफाचा उत्तम 'नमुना' आहे. हा आदेश पुढीलप्रमाणे-
महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २३

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २२